कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजप नेत्यांना ग्रामस्थांनी पिटाळले

लखनउ : काही महिन्यांपूर्वी पारित केलेल्या कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार आणि भाजपच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनाही जागोजागी विरोधाचा सामना करावा लागत आहे. उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेल्या भाजपाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हाकलून दिल्याची घटना घडली आहे. यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांनी भाजपा मुर्दाबाद अशी घोषणाबाजीही केली.
भाजपाच्या नेत्यांचे हे शिष्टमंडळ खाप चौधरींची भेट घेण्यासाठी गावात आले होते. मात्र ग्रामस्थांनी वाटेत ट्रॅक्टर ट्रॉली लावत त्यांची वाट अडवली. त्यानंतर शिष्टमंडळामध्ये असलेले केंद्रीय मंत्री संजय बालियान यांचे समर्थक आणि स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. ही घटना शामली जिल्ह्यातील भैंसवाला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री संजय बालियान यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या मंत्री आणि नेत्यांचे एक शिष्टमंडळ बत्तीसा खापचे चौधरी बाबा सूरजमल यांच्यासोबत कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र येथे येत असताना त्यांना शेतकऱ्यांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. गावात मंत्री येत असल्याचे कळताच ग्रामस्थांनी रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली लावून वाट अडवली. त्यानंतर मंत्री आणि शिष्टमंडळाने कसाबसा गावात प्रवेस केला. मात्र शेतकऱ्यांनी भाजपा मुर्दाबादची घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर मंत्री संजय बालियान यांचाही तोल सुटला. त्यांनी गाडीवर उभे राहत शेतकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. अशा दहा जणांनी विरोध केल्याने मुर्दाबाद होत नाही. दरम्यान, बुढियान खापचे बाबा सचिन कालखंडे, बाबा संजय कालखंड यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिला होता. त्यानंतर गठवाला खापचे बाबा हरिकिशन मलिक यांची भेट घेण्यासाठी ते भैंसवाला गावात पोहोचले होते.