स्वातंत्र्याच्या लढाईत चड्डीवाले इंग्रजांसोबत होते; वसंतदादांच्या नातवाची भाजपवर टीका

सांगली : वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला भाजपला अजून खूप मोठे घोटाळे करावे लागतील, अंबानीसारखे अनेक लोक उभे करावे लागतील. स्वातंत्र्याच्या लढाईत चड्डी घातलेले लोक इंग्रजांबरोबर होती. दुर्दैवाने आपल्या नाकर्तेपणामुळे त्यांना दिल्लीचे तख्त मिळाले, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.
वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला भाजपला अजून खूप घोटाळे करावे लागतील. अनेक अंबानी अदानी तयार करावे लागतील. कारण या घराण्याचं राजकारण सत्तेवर टिकले नाही. वसंतदादा यांचे विचार पैशाने निर्माण झाले नाहीत. विचाराने गर्दी होते, असं विशाल पाटील म्हणाले. ते सांगलीत कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मला बाहेरच्या पक्षातून खूप फोन आले. भांडणं लागली काँग्रेसमध्ये, पण मी मागच्यावेळी सुद्धा सांगितले होते की, वसंतदादा घराण्याचा विचार माझ्या नसानसांत भरलेला आहे.
काही लोक बसले आहेत जे देश चालवतात, देश चालवतात म्हणजे त्यांचा जुना राग काढत आहेत. या स्वातंत्रच्या लढाईत ही आरएसएसची चड्डी घातलेले लोकं इंग्रजांबरोबर होती. दुर्दैवाने आपल्या नाकर्तेपणामुळे त्यांना दिल्लीचे तख्त मिळाले आहे. ते दिल्लीचे तख्त काढून घ्यायचे असल्याने आपल्याला काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्षपद दिलं आहे, असं विशाल पाटील म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी विशाल पाटील यांनी स्वीकारली. यापुढील काळात कार्यकर्ते आणि स्वतःच्या ताकदीच्या जोरावर पद आणि उमेदवारी मिळवू,असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला. उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर ‘दिशा संवाद’ कार्यकर्ता मेळाव्यातून त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार केला आहे.




