मुक्तपीठ

आशादीप वसतीगृहातील सत्य नेमकेपणाने समोर यायलाच हवे

- दिलीप तिवारी, जळगाव

जळगाव येथे महिला-बालकल्याण विभागाच्या नियंत्रणात असलेल्या आशादीप वसतीगृहाच्या संदर्भात दोन दिवस झाले माध्यमांमध्ये उलट सुलट बातम्या सुरू आहेत. या प्रकरणात मौखिक तक्रार आलेली आहे की, वसतीगृहातील महिला-मुलींना नग्न करून नृत्य करायला लावले जाते. हा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणात एका तरुणीच्या ओरडून माहिती देण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यातून नेमके काय घडले समजत नाही. पण संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पोहचली ती, नग्न करून नृत्याची. याला जोडूनच आता लोकांना असेही वाटते आहे की, नग्न नृत्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे. हा प्रचार जळगावसाठी डेंजर व बदनामीकारक आहे.

मला आज दोन अनुभव आले. पहिला म्हणजे यापूर्वी जळगावमध्ये सन १९९४ मध्ये घडलेल्या लैंगिक छळ प्रकरणाचे संदर्भ घेत माझी चैनलसाठी प्रतिक्रिया मागितली गेली. मी त्याला नकार दिला. कारण तेव्हा ते प्रकरण असेच भरकटले होते. उताविळ पोलीस अधिकाऱ्यांसह उताविळ पत्रकारांनी लैंगिक छळातील महिलांचा आकडा ५०० वर नेला होता. जेव्हा की ते सारे थोतांड होते. एखाद दुसऱ्या प्रकरणातून लैंगिक छळाचा किस्सा समोर आला. पण ते समुह प्रकरणच उभे झाले. तेव्हा चर्चा होती जळगाव कैसेटची. त्यानंतर अलिकडचा विषय म्हणजे जळगावमधील नेत्यांनी राजकीय हेव्यादाव्यातून सीडी असल्याचे प्रकरण उभे केले आहे. त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही तोवर आता हे वसतीगृहातील नग्न नृत्याची व्हिडिओ क्लिप असल्याची फालतू चर्चा उभी झाली.

दुसरा अनुभव आला, मुंबईतील एक पत्रकाराने वसतीगृहाची क्लिप माझ्याकडे मागीतली. मी त्यावरही हादरलो. महाराष्ट्रातील माध्यमे या प्रकरणात सत्य जाणून न घेता आता वसतीगृहात नग्न नृत्य चालते याचाच प्रचार करणार हे लक्षात आले. मला हे सारे बदनामीकारक वाटते आहे.

खरे तर आशादीप वसतीगृहात नेमके काय घडले ? हे तेथे जाऊन समजून घ्यायला हवे. या सरकारी वसतीगृहावर अशासकीय महिला सदस्य नियुक्तीवरून वाद आहेत. पूर्वीचे पदाधिकारी बदलून नवे आले आहेत. या शिवाय, वसतीगृहातील काही महिलांची व्यवस्थेविषयी (जेवण आणि मासिक पाळीच्या स्वचूछतेविषयी) तक्रार आहे. एखाद दुसरी महिला आक्राळास्तपणाही करू शकते. त्यातून उद्भवलेल्या विवादाचीही याला किनार आहे. आशादीप वसतीगृह गणेश कॉलनीत भर वर्दळीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तेथे महिलांचे नग्न नृत्य वगैरे प्रकाराचे धाडस कोणीही करू शकत नाही. मग असे असताना नग्न नृत्याचा विषय उद्भवला कसा ? हाच शोध पत्रकारांनी घ्यायला हवा. यापूर्वीची व्हिडिओ कैसेट आणि आताची सीडी अशा प्रकरणांमुळे देशभरात बदनामी झालेली असताना नग्न नृत्याचे मिथ्या कशाच्या बाळावर पसरवले जाते आहे ? याचा शोध वेळीच घ्यायला हवा.

वसतीगृहात तहसीलदार, पोलीस व इतर महिला संघटनांनी भेट देऊन बऱ्यापैकी वास्तव समजून घेतले आहे. माध्यमांनी त्यापर्यंत पोहचायला हवे. या प्रकरणात नग्न नृत्य हे शब्द वापरताना १० वेळा विचार करायला हवा. *(गरम दुधाने तोंड भाजलेला माणूस ताकही फुंकून पितो, हे माध्यमातील मंडळींनी लक्षात घ्यावे.)* एकदा का नग्न नृत्याचा मिथ्या प्रचार झाला की, भविष्यात कोणतीही क्लिप जळगावची म्हणूनच कुप्रसिद्ध होईल …

यापूर्वीची कालाकौआ व्हिडिओ कैसेट आणि पुढाऱ्याची सीडी अजून एकानेही पाहिली नाही … पण प्रचार होतो आहेच ना ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button