मुंबई : राज्य सरकार ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) रिक्त जागा भरणार आहे, अशी घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. मात्र ३१ जुलै तारीख संपली असताना देखील राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही. त्यावर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून विधिमंडळात केलेल्या घोषणेचा विसर पडलाय का? असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत. भाजपा नेते निलेश राणेंनी ट्विट करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैची डेडलाईन दिली होती, ती आता संपली आहे. त्यामुळे, संतप्त विद्यार्थ्यानी राग व्यक्त केला. तसेच पुन्हा कोणाला तरी आत्महत्या करावी लागणार का?, म्हणजे सरकारला जाग येईल, अशा प्रश्न उपस्थित केला आहे. एमपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण होउन दोन वर्ष पदे न भरल्याने स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी ३१ जुलैपर्यंत रिक्त सदस्य भरले जातील असे जाहीर केले होते. आता, तोच व्हिडिओ शेअर करत निलेश राणेंनी अजित पवारांवर बोचरी टीका केली.
MPSC मार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे ३१ जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती आज ३१जुलै आहे रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला. pic.twitter.com/SoZHGlk9aE
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 31, 2021
एमपीएससीमार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे ३१ जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती आज ३१जुलै आहे रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला, अशा शब्दात राणेंनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला केला आहे. तर, भाजप नेते माधव भंडारी यांनीही ट्विट करुन यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.