नवी दिल्ली : पुण्यातील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. त्यातच, आता देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत यंदाच्या वर्षी वाढ झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे आलेल्या महिलांवरील गुन्ह्यांच्या तक्रारीत ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ८ महिन्यांत ९७४ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवाडीतील निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणे ही उत्तर प्रदेशातील आहेत. सन २०२१ च्या पहिल्या ८ महिन्यातील आकडेवारीनुसार आयोगाकडे १९,९९३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तुलनेत गतवर्षी १३,६१८ तक्रारी दाखल झाल्या होत्या. एकट्या जुलै महिन्यात ३२४८ तक्रारी दाखल झाल्या असून २०१५ नंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे. दरम्यान, आयोगाने जागरुकता अभियान नियमीतपणे राबवले. तसेच, महिलासांठी हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढल्याचं आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे. आयोगाकडील आकडेवाडीनुसार उत्तर प्रदेश सर्वाधिक तक्रारी असलेले राज्य असून दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे दिल्लीच्या तुलनेत युपीतील तक्रारींची संख्या ५ पटीने अधिक आहे.