शेतकरी आंदोलनाचा परिणाम नाही; ३५० जागा जिंकून ‘मी पुन्हा येईन’ : योगी आदित्यनाथ
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण आणखी तापताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० महिन्यांपासून आंदोलन सुरू असून, अलीकडेच पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात उत्तर प्रदेशमधील ८०० ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यातच या शक्यता खोडून काढत शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा येईन, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
आगामी निवडणुकीत राज्यात भाजपा सहजच जिंकेल. भाजप फक्त जिंकणारच नाही, तर २०१७ मध्ये ३१२ जागा जिंकण्याचा रेकॉर्ड तोडत ३२५ ते ३५० जागा जिंकेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंतची राज्य सरकारची कामगिरी, आर्थिक विकास, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहूनच पुन्हा एकदा विजय प्राप्त होईल. सरकारच्या कारभाराच्या रेकॉर्डवर लक्ष केंद्रित करून आणि जातीय समीकरणाचा समतोल साधून कोणत्याही सत्ताविरोधावर मात करता येऊ शकेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडणार नाही. मला पुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. उत्तर प्रदेशची राजकीय गतिशीलता चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, कारण गेल्या २३ वर्षांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणात आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांची राजकीय समज आणि परिपक्वतेबद्दल विश्वास आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपने आरपीआयशी युती करून आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढली पाहिजे. भाजपाने आम्हाला १० ते १२ जागा द्याव्यात. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून, भाजपाने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल असे सांगितले आहे, अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अलीकडेच दिल्याचे सांगितले जात आहे.