Top Newsराजकारण

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव : पंतप्रधान मोदी

काँग्रेस नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावत पदकं पटकावत आहेत. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचं नाव बदलण्याचं ठरवलं आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद पुरस्कारने यापुढे ओळखलं जाईल असं त्यांनी सांगितले.

ऑल्मपिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. विशेषत: हॉकीमध्ये आपल्या पुरुष-महिला खेळाडूंनी जी इच्छाशक्ती दाखवली. विजयासाठी जी जिद्द दाखवली ती वर्तमान काळात आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप मोठी प्रेरणा देणारी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

खेलरत्न पुरस्काराचा इतिहास

या पुरस्काराची सुरुवात १९९१-९२ मध्ये झाली होती. तेव्हा या पुरस्काराचं नाव देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर नावावर ठेवलं होतं. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येत होते. खेळाडूंना सन्मानित करून त्यांची प्रतिष्ठा वाढवणे. समाजात अशा खेळाडूंना प्रतिमा उंचावणे यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जात होता. मात्र आता या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखले जाईल.

काँग्रेस नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. ‘राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार २००२ पासून आधी आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे’, अशी टीका सचिन सावंत यांनी केलीय.

त्याचबरोबर, शहीद राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र व हिरो होते. त्यामुळे मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही. स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता आहे. तरीही जर खेळाडूंचे नाव देण्याची तात्विक भूमिका असेल. तर मोदी व जेटली यांच्या नाव ज्या स्टेडियमना दिले आहे ते बदलून दिग्गज खेळाडूंचे नाव देण्याची सुरुवात करा. सरदार पटेलांचे नाव छोटं करुन हयातीतच स्वतःचे नाव स्टेडियमला देणारे मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा. मेजर ध्यानचंद अमर रहे! राजीव गांधी अमर रहे!, असा खोचक टोलाही सावंत यांनी मोदींना लगावलाय.

अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या : नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि संघाने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला आहे, असा घणाघात नाना पटोलेंनी केलाय. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती, त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता, त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. त्यांचे नाव दिल्याचा आम्हाला आनंदच आहे, परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या नावाने विविध क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्काराच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जात असे. राजीव गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान आणि करोडो लोकांच्या मनातील स्थान मोठे असून, अशा पद्धतीने ते स्थान तसूभरही कमी होणार नाही, असंही त्यांनी सांगितले.

मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान काय?

राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल, तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचे नाव देता आले असते, परंतु त्याचे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलेच, त्यामुळे राजीव गांधी यांचे नाव बदलल्याने आश्चर्य वाटत नाही, ही कृती भाजपा आणि संघाच्या द्वेषमूलक वृत्तीतून आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी असलेली आर्थिक तरतूद कमी करायची आणि दुसरीकडे आपले सरकार क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंचे किती हित जपते हे दाखवण्यासाठी असे केविलवाणे काम करायचे, यातून क्रीडा क्षेत्राचा अथवा खेळाडूंचा कोणताच फायदा होणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button