सचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे?; नितेश राणेंचा सवाल

मुंबई : सचिन वाझे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षावर जाऊन कसे राहायचे? त्यांना कुणी परवानगी दिली? असा सवाल करतानाच सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माणूस आहे. त्यांनाच रिपोर्टिंग व्हायचे. परमबीर सिंग यांना ते विचारतच नव्हते, असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. सचिन वाझे प्रकरणात एनआयए चौकशी करत असताना नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा आरोप केला आहे.
अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या प्रकरणी एनआयए चौकशी करत असून सचिन वाझे हे सध्या एनआयएच्याच कोठडीत आहेत. नितेश राणेंनी सचिन वाझे प्रकरणावरून थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंग यांना ते विचारायचे नाहीत. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत होते.




