अर्थ-उद्योग

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची पत खालावली : रघुराम राजन

मुंबई : मोदी सरकारने अर्थविषयक घेतलेल्या चुकीच्या धोरणांचा फटका आगामी काळात देशाला बसू शकतो. आज आपली आर्थिक पत खालावली आहेच; पण ती लवकर पूर्वपदावर येण्याची शक्यता नाही. असे चुकीचे निर्णय घेतले जात असल्याची टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे. नलसार युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित एका ऑनलाईन कार्यक्रमात राजन बोलत होते.

याआधी देशाने संकटातही परिस्थितीचा सामना केला होता. कारण तेव्हा घेतलेल्या निर्णयाचे ते परिणाम होते. आता निर्णयाचीच वानवा असल्याने कठीण परिस्थितीत सामना करणे अवघड झाले आहे. यातच कोरोनासारख्या महामारीने जगाची अडचण झाली आहे. मात्र, त्यात आपण सर्वाधिक भरडतो आहोत, असे राजन म्हणाले. देशाच्या आर्थिक भवितव्यावरचा भारतीयांचा विश्वास गेल्या काही वर्षांत उडू लागला आहे. त्यात कोरोनामुळे अनेक मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसला असून ते अधिकच गरिबीकडे झुकले आहेत.

कोविडच्या संकटाने आपला आत्मविश्वास अधिकच कमकुवत केला आहे, असे मत राजन यांनी मांडले. भारतातील शेअर बाजार दिवसेंदिवस मोठमोठाले आकडे दाखवत आहेत. पण हे आकडे भारतीय नागरीक सामना करत असलेल्या समस्या नक्कीच दाखवत नाहीत. सामन्यांना तिथल्या आकडेवारीचे काही देणेघेणे नाही. मात्र, त्यांना हे आकडे त्यांच्या माथी मारत देश योग्यतेवर असल्याचा अभ्यास केला जात असल्याचे रघुराम राजन यांनी स्पष्ट केले.

देशाचा विकासदर आधीच्या १०.५ टक्क्यांवरून रिझर्व्ह बँकेने तब्बल एक टक्क्याने कमी करत ९.५ टक्के इतका अंदाजित केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेदेखील हा दर २०२१मध्ये ९.५ तर २०२२ मध्ये त्याहून एक टक्क्याने कमी म्हणजेच ८.५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. घसरत्या आर्थिक परिस्थितीमुळे लोकशाही मूल्यांना धक्का लागत असल्याचे रघुराम राजन म्हणाले. आपल्या अर्थव्यवस्थेची कामगिरी खालावत जात असताना आपली लोकशाही मूल्ये, चर्चा करण्याची आपली तयारी, मतभेदांचा सन्मान करण्याच्या आपल्या तत्वांना देखील धक्का बसतो आहे. हे फक्त केंद्रातच होत नाही. अनेक राज्यांचा कारभारही याच मार्गात असल्याची टीका त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button