नवी दिल्ली/पणजी : योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे अंहकारयुक्त सरकार आहे. अहंकार सगळ्यांना एक दिवस संपवून टाकतो. त्यामुळे योगी आणि भाजपला आगामी निवडणुकीत कोणीही मतदार मत देणार नाही. भाजपचे लोक जर म्हणत असतील की आम्ही बहुमताने निवडून येऊ तर त्यांना माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला मतदान करायला गंगेत वाहून गेलेले मृतदेह येणार आहेत का? कारण जिवंत लोक योगींना आणि भाजपला मत देणं शक्यच नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हल्लाबोल केला.
अखिलेश यादव यांनी आपलं संपूर्ण लक्ष निवडणुकांवर केंद्रित करायला हवं. भाजरच्या विचारधारेच्या विरोधी विचारधारा असणाऱ्या पक्षांची एकत्रित मोट बांधून निवडणुक लढवायला हवी. उत्तर प्रदेशची जनता अखिलेश यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. आम्हीदेखील निवडणुकीत लढत आहोत. पण परिवर्तन आणायचं असेल तर बिगरभाजप पक्षांनी एकत्रित येऊनच निवडणूक लढवायला हवी, असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलं.
पंतप्रधान मोदींनी कुंभस्नान केलं आणि नंतर दलितांचे पाय धुतले. आता भाजपचे लोक देखील दलितांच्या घरी जाऊ जेवत आहेत आणि त्यांची सेवा करत आहेत. अशा लोकांच्या डोक्यातून जातीपातीचं राजकारण कधी जाणार, असा मला प्रश्न पडतो. हे सारं भाजपचं ढोंग आहे. केवळ मतदानासाठी हे राजकारण केलं जातंय, असा आरोप राऊत यांनी भाजपवर केला.
…तर उत्पल पर्रिकरांविरोधात अन्य पक्षांनी उमेदवार देऊ नये !
गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आताच्या घडीला भाजपमधून बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या उत्पल पर्रिकर यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच संजय राऊत यांनी अन्य सर्व पक्षांना आवाहन करत उत्पल पर्रिकर यांच्याविरोधात उमेदवार देऊ नयेत, असे म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपकडे तिकिटासाठी दावा केला आहे. भाजपने त्यांना तिकीट न देण्याचे संकेत दिले असले तरी, त्यांना तिकीट नाकारणेही महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोर त्रांगडे निर्माण झाले आहे. तसेच भाजपने उमेदवारी नाकारल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी उत्पल पर्रिकर यांनी केल्यामुळे भाजपसमोरील पेच वाढल्याचे सांगितले जात आहे. अशातच संजय राऊत यांनी सर्वपक्षीयांना आवाहन केले आहे.
मनोहर पर्रिकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचे नक्कीच योगदान होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाशी भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे अपमान केला आहे, हे कोणाच्या मनाला पटलेले नाही. पर्रिकरांच्या कुटुंबाविषयी तुम्ही अशाप्रकारे बोलताय तर तुमची लायकी काय, अशी विचारणा करत, उत्पल पर्रिकर जर अपक्ष लढणार असतील, तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे. आप, काँग्रेस, तृणमूल आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी उत्पल पर्रिकरांविरोधात उमेदवार देऊ नये, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
भाजपला उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी द्यावीच लागेल, याची मला खात्री आहे. आमचा दबाव आहे. आम्ही सगळे त्यांच्या पाठी उभे राहिलो म्हणून भाजपला उमेदवारी द्यावीच लागणार आहे. मनोहर पर्रिकर यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, महाराष्ट्रातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना, वैफल्य आहे. निराशा आहे. त्यातून अशा प्रकारची भाषा वापरली जात आहे. अटलींचे संस्कार ते विसरले आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.