राजकारण

गोव्यात स्थिर सरकार द्या, आम्ही पुरेसा निधी देऊ : गडकरी

पणजी : ‘भारतमाला-२’ अंतर्गत गोव्याला राष्ट्रीय महामार्गांसाठी केंद्र सरकारची आणखीही निधी देण्याची तयारी आहे. राज्य सरकारने केवळ प्रस्ताव पाठवावेत, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी जाहीर केले. केंद्राने गोव्याला रस्त्यांसाठी २२ हजार कोटी आणि बंदर विकासाकरिता ४ हजार कोटी दिले. गोव्याच्या जनतेने आम्हाला स्थिर सरकार द्यावे, आम्ही गोव्याला पुरेसा निधी देऊ, असे गडकरी यावेळी म्हणाले.

भाजपच्या राज्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते. येथील सरस्वती मंदिर इमारतीत हे कार्यालय उघडण्यात आले आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार बाबुश मोन्सेरात, नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, सावंत यांनी पर्रीकरांची उणीव भासू दिली नाही. विकासाच्या बाबतीत ते नेहमीच दक्ष राहिले. पर्रीकरांएवढ्याच निस्पृह आणि निस्वार्थी भावनेने ते काम करीत आहेत. गोवा पर्यावरणाबाबतही दक्ष आहे आणि लवकरच गोवा हे पहिले प्रदूषमुक्त राज्य ठरेल.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गडकरी गोव्याकडे आपले राज्य म्हणून पाहतात आणि भरभरुन मदतही करतात. त्यांनी गोव्याला अनेक प्रकल्प दिले. सावंत यांनी यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समाचार घेतला. सावंत म्हणाले की, केजरीवाल हे अर्ध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीत आरोग्य आणि शिक्षण वगळता अन्य गोष्टी राज्य सरकारच्या हातात नाही. अर्ध्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला शहाणपणा शिकवू नये. दिल्लीत सरकार प्रदूषणाची समस्या दूर करु शकलेले नाही म्हणून ते शुध्द हवेसाठी पुन: पुन: गोव्यात येतात. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर गाशा गुंडाळून त्यांन जावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button