
बुलडाणा: भाजपने नुकतीच विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे मागील अनेकवेळा डावललेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना यंदातरी उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. पण, यावेळेसही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेवर वर्णी लावली आहे. या निर्णयानंतर पंकजा मुंडे यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा सर्वांसमोर आली.
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यता आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी परत एकदा मनातील खदखद बोलून दाखवली. माझे माता-पिता माझे सर्वस्व तुम्ही आहात. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल. पण, पदासाठी कुणासमोरच हात फैलावून मागणी करणार नाही, असं त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, राजकारणात संधी नाही मिळाली तर नाही, पण लोकांच्या सेवेची संधी सोडायची नाही, ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नि देताना घेतली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. पद असो वा नसो, मी प्रथम जनतेची सेवा करण्याला प्राधान्य देईल. पण, पदासाठी कधीच कुणासमोरच हा फैलावणार नाही, आमच्या रक्तातच तशी सवय नाहीये, असंही त्या म्हणाल्या.
भाजपने दोन दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. पक्षाने अमल महाडिक, अमरिश पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार, अशी चर्चा होती. मात्र, यावेळीही पंकजांच्या पदरी निराशा पडली. विशेष म्हणजे, विधानसभेच्या वेळी तिकीट कापण्यात आलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना संधी देण्यात आली आहे.