पुणे : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जाऊन शक्ती दाखवली. राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर आपण आहोत, असं राऊत म्हणाले. संजय राऊत हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.
संजय राऊत हे शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. खेड-शिरुरच्या सेना कार्यकर्त्यानी त्यांचं सकाळी जोरदार स्वागत केलं. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे राऊतांनीही जोरदार बॅटिंग केली. राज्यात जरी तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार असलं तरी शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी धुसफूस आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांचा पुणे-शिरुर दौरा महत्त्वाचा आहे. अपेक्षेप्रमाणे राऊतांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे दिले.
राज्यात जरी तीन पक्षाचं सरकार असलं तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचं सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या वर आहे. ही आपली पॉवर आहे, असं संजय राऊत म्हणाले. मात्र, पुढे बोलताना त्यांनी शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, असं राऊत म्हणाले. तसंच, त्यांनी भाजपला अजूनही शिवसेनेची गरज लागते, असं म्हणत पक्षाचं महत्त्व अधोरेखीत केलं.