Top Newsफोकस

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या मुंबईकरांना यूटीएस अ‍ॅपवरून मिळणार तिकीट

मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासाजनक बातमी आहे. कारण यूटीएस मोबाईल अ‍ॅपला आता युनिव्हर्सल पास लिंकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय यूटीएस मोबाईल अ‍ॅपवरून तिकिट मिळणार आहे. लोकलने प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस मिळालेले असतील आणि शेवटच्या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी झाला असेल अशांना राज्य सरकारच्या पोर्टलद्वारे लसीकरण स्थितीची योग्य पडताळणी केल्यानंतर युनिव्हर्सल पास मिळणार आहे.

तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागेल. आता युनिव्हर्सल पास जारी करणारे राज्य सरकारचे पोर्टल रेल्वेच्या यूटीएस मोबाइल ॲपशी जोडले गेले आहे. त्यामुळे वर नमूद केलेल्या श्रेणीतील प्रवासी काउंटरवर न जाता तिकीट खरेदी करु शकणार आहेत. या ॲपद्वारे प्रवाशांना तिकीट आणि मासिक तिकीट दोन्ही खरेदी करता येणार आहे. तर मासिक तिकिटांचे नूतनीकरण देखील शक्य आहे. यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना काउंटरवर जाण्याची गरज नाही. ही सुविधा २४ नोव्हेंबर २०२१ पासून अँड्रॉइड गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध होईल.

ज्या प्रवाशांनी यापूर्वीच युटीएस मोबाइल अ‍ॅप डाउनलोड केले आहे त्यांना ही नवीन युटिलिटी सक्रिय करण्यासाठी अ‍ॅप अपडेट करावे लागेल. प्रवाशांच्या लसीकरण स्थितीची पडताळणी करणारी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे महामारीच्या काळात युटीएस मोबाइल अ‍ॅप बंद करण्यात आले होते. आता युटीएस ॲप प्रवाशांसाठी पुन्हा सुरु करण्यात आले आहे. योग्य लसीकरण पडताळणीद्वारा राज्य सरकारचे पोर्टल आणि रेल्वे युटीएस मोबाइल अ‍ॅप लिंक करणे शक्य झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button