मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांकडून अडवण्यात आल्याने निर्माण झालेला सुरक्षेचा प्रश्न झाला होता. त्यावरून आता काँग्रेस आणि भाजपामध्ये वाकयुद्ध पेटले आहे. या घटनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका करताना त्याचा उल्लेख नौटंकी असा केला होता. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नौटंकी करणे हा नाना पटोलेंचाच स्वभाव असल्याचा टोला लगावला होता. त्याला आता नाना पटोले यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे.
नाना पटोले म्हणाले की, चंद्रकांतदादा, या देशामध्ये नौटंकीबाज कोण आहे हे जगाला माहिती आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे इंदिरा गांधी यांनी सहजतेने केले. पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधी कुठे आणि सभेला १०० लोक जमले नाहीत म्हणून पळणारे मोदी कुठे? त्या काळामध्ये इंदिरा गांधींनी अमेरिका असो वा चीन असो, या सर्वांना बाजूला ठेवून देशाच्या एकात्मतेसाठी, देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी आणि देशाला महासत्ता बनवण्यासाठी केलेला प्रयत्न देशातील सर्व लोकं जाणतात. इंदिरा गांधींसोबत नरेंद्र मोदींची तुलना करणे हे हास्यास्पद आहे. हे सर्व जनता समजत आहे. तुमची नौटंकी देशातील जनतेला समजली आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभर निवडणूक लांबवून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत राज्यपालांवर खापर फोडण्याचा त्यांच्या आघाडीचा प्रयत्न म्हणजे नौटंकी होती. नाना पटोलेंच्या राजकीय आयुष्यात नौटंकीचे अनेक प्रसंग आहेत. नौटंकी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.