Top Newsराजकारण

मुख्यमंत्री घराबाहेर पडायला घाबरतात त्याला आम्ही काय करणार?, सण साजरे होणारच : राज ठाकरे

मुंबई : लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थीती सध्या झाली आहे. त्यामुळेच दुसरी लाट, तिसरी लाट आणि चौथी लाट अशी भीती घातली जातेय, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केला आहे. ते मुंबईत ‘कृष्णकुंज’वर पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधाला न जुमानता आज ठिकठिकाणी मनसैनिकांनी दहीहंडी साजरी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण साजरं करायला बंदी. कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का? तिथं भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात प्रवेश करुन अभिषेक केला. केली मग सत्ताधाऱ्यांसाठी नियम वेगळे आहेत का? आम्ही दहीहंडी फोडायची नाही का?”, असे सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

राज्यात सर्व कामं व्यवस्थित सुरू आहेत. महापौर बंगल्यावर रोज बिल्डरांची वाहनं येताना दिसतात. लोकांना कोरोनाचं कारण देऊन फक्त भीती घालण्याचं काम सुरू आहे. जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण साजरे करायला बंदी. कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का? लोकांना कोरोनाचं कारण देऊन फक्त भीती घालण्याचं काम सुरू आहे. फक्त ‘ते’ घराबाहेर पडत नाहीत त्याला आम्ही काय करणार?, असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

मग स्टुलावर उभं राहून हंडी फोडायची का?

राज्य सरकारने दहीहंडीच्या सणावर निर्बंध लादले आहेत. जास्त थर रचू नका, असे सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभं राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी म्हटले.

‘तो’ फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार

ठाण्यातील कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले गेले आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच आजपर्यंत कोणी असं अधिकाऱ्यांवर हल्ला केला नव्हता. आज हल्ला केलाय आणि त्याला पोलिसांनी अटक केली. उद्या तोच जामिनावर सुटेल व पुन्हा हल्ला करायला मोकळा असेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. मात्र ज्या दिवशी हल्लाखोर फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्याचदिवशी त्याला मनसैनिक चोप देतील. भीती काय असते ते त्याला दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

कोरोनाची तिसरी लाट येतेय? तो काय समुद्र आहे काय?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना तिसरी लाट येतेय? याबद्दल राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, लाट यायला समुद्रय का, असा भन्नाट प्रतिप्रश्न राज यांनी केला. कुठं काही जाणवतंय का तुम्हाला. उगीच इमारती सील करायच्या, यापूर्वी या देशात कधी रोगराई आलीच नव्हती, असे म्हणत राज यांनी संताप व्यक्त केला.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं सुरू आहे. मी तर बाहेर पडतोच आहे, मी माझ्या लोकांनाही सांगितलंय. सरकारने लवकरच मंदिरे उघडी न केल्यास आम्ही मंदिराबाहेर घंटानाद करू, असा इशाराही राज यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button