राष्ट्रीय संपत्ती विकणे हा कोणता राष्ट्रवाद?; कन्हैया कुमार यांचा मोदींवर निशाणा

पणजी – जनतेचा पैसा हा नरेंद्र मोदींच्या सुटबुटावर खर्च होतो. भाजप आपल्या जाहिरातबाजीसाठी जनतेचा पैसा खर्च करत आहे. यांचे पुन्हा एकदा सरकार आल्यानंतरही तुमच्याच टॅक्सच्या पैशातून पैसा वसूल करण्याचे काम यांनी केले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे युवानेते कन्हैया कुमार यांनी केला आहे. ते गोव्यात बहुजन संवाद या उपक्रमाच्या अंतर्गत म्हापसा येथील सभेत बोलत होते.
भाजपने देशाला काहीच दिलेले नाही. काँग्रेसला माझी गरज नाही, तर मला काँग्रेसची गरज आहे. काँग्रेस जनमानसात रुजलेला देशव्यापी पक्ष आहे. देशाचा इतिहास खूप मनापासून वाचला, काँग्रेसचा विचार हाच खरा देशाचा विचार आहे. ज्यांना देश वाचवायचा असेल, त्यांनी काँग्रेस विचार अवलंबने गरजेचे आहे. ज्यांनी या देशात संस्था उभारल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्यांना त्याची किमंत असते. म्हणून काँग्रेस कायमच बीएसएनएल, रेल्वे, एअर इंडिया वाचविण्यासाठी अग्रभागी आहे. भाजपने देशाला काहीच दिलेले नाही, त्यामुळे ते केवळ या गोष्टी खासगीकरण करून विक्रीत काढत आहेत. देशाच्या नावाने देशातील उद्योजक मोठे करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत, अशी टीका देखील यावेळी कन्हैया कुमार याने केली.
राज्यातील सर्वच यंत्रणा भाजपने सत्तेच्या दबावात आपल्या ताब्यात ठेवल्या असून पैशाच्या जोरावर भाजप निवडणुका जिंकत आहे असा आरोपही कन्हैया यांनी केला आहे. सर्व स्वतंत्र असणाऱ्या सर्वच यंत्रणांना भाजपने आपल्या मतानुसार वापरण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला मतदान करण्याचा हक्कही उरतो की नाही अशी शंकाही कुमार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान आपल्या देशाची सारी संपत्ती स्वत:च्या मित्रांना विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसची ही लढाई देश विरुद्ध पंतप्रधानांचे मित्र अशा स्वरूपाची आहे. विकणारे व त्यापासून वाचवणारे यांचा हा लढा आहे. त्यामुळे कोणाच्या बाजूने उभे राहावे, हे जनतेनेच ठरवायचे आहे. आपला हक्क आणि अधिकार यांचे हितरक्षण कोण करीत आहे, याचा विचार सर्वस्वी जनतेनेच करायचा आहे असही कुमार यावेळी म्हणाले आहेत.