मुंबई : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल, असा हल्ला चढवत राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा व संस्कृती गमावली आहे, अशी खंत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी-दिवंगत जेटलींचं नाव क्रिकेट स्टेडियमला दिलं गेलंय… त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती?, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने हा राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत, असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारविरोधात टीकेची तोफ डागली आहे.
सध्या देशाचे वातावरण खेळमय झाले आहे. एरव्ही ते क्रिकेटमय झालेले दिसते. टोकियो ऑलिम्पिकमुळे देशात इतर खेळांवर उत्साहाने चर्चा होत असताना निरज चोप्रा याने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. या सुवर्ण क्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलताना लोकभावना होती, असं सांगून सरकार मोकळं झालं. लोकभावना वगैरे बोलायला ठीक आहे, पण सध्या राज्यकर्ते ठरवतात तीच लोकभावना व त्या लोकभावनेवर भजनाचे टाळ वाजवणे हेच सुरु आहे. पण राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल, असा महत्त्वाचा मुद्दा राऊतांनी अधोरेखित आहे.
राजीव गांधींचं बलिदान चेष्टेचा विषय होऊ शकत नाही
इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. राजीव गांधी यांनाही दहशतवादी हल्ल्याचे बळी व्हावे लागले. या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात. लोकशाहीत मतभेदांना स्थान आहे, पण देशाच्या प्रगतीत मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरु शकत नाही. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा व संस्कृती गमावली आहे, असे उद्वेगाचे शब्द राऊतांनी काढले आहेत.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. १९९१-९२ सालापासून राजीव गांधींच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. अनेक महान खेळाडूंना आतापर्यंत हा पुरस्कार प्रदान केला गेला, पण राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असे यापैकी कोणीही म्हटल्याचे दिसत नाही. आता टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघास ब्राँझ पदक मिळताच मोदी सरकारने राजीव गांधींचे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नामकरण करणे हे अनाकलनीय आहे. ध्यानचंद यांच्या खेळाने अनेकांना मोहित केले होते. बर्लिन ऑलिम्पिकनंतर जर्मनीचे तेव्हाचे सत्ताधीश अॅडॉल्फ हिटलर हे इतके प्रभावित झाले की, त्यांनी ध्यानचंद यांना जर्मनीचे नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव ठेवला. ध्यानचंद यांनी जर्मनीसाठी खेळावे, असा त्यांचा आग्रह होता, पण ध्यानचंद यांनी नकार दिला. ते अखेरच्या श्वासापर्यंत भारतासाठीच खेळत राहिले. मिल्खा सिंग, ध्यानचंद ही अशी नावे आहेत की, देशवासीयांना त्यांचे विस्मरण कधीच होणार नाही.
आज मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केले. याचा अर्थ आधीच्या सरकारांना ध्यानचंद यांचे विस्मरण झाले होते असे नाही. १९५६ साली ध्यानचंद यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले. ३ डिसेंबर १९७९ रोजी या महान खेळाडूचे दिल्लीत निधन झाले. ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय खेळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान केले जातात. मेजर ध्यानचंद व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठेच आहे. ते एक उत्तम माणूस होते व पंडित नेहरुंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या राजीव गांधी यांचे नाव पुसून तेथे मेजर ध्यानचंद यांचे नाव लावणे हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असे मानता येत नाही.
राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेषाचे राजकारण आहे. ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती. आता भाजपमधील राजकीय खिलाडी असे सांगत आहेत की, ‘राजीव गांधी यांनी कधी हातात हॉकीचा दांडा धरला होता काय?’ हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे, पण अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केले. मग मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी पार पाडली? किंवा अरुण जेटली यांच्या नावाने दिल्लीत स्टेडियमचे नामकरण केले. तेथेही तोच निकष लावता येईल.