
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत पंतप्रदान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. दरम्यान, कोरोना संकट असताना त्यात तौक्ते चक्रीवादळाने भर टाकली आहे. शेवटी वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यावर नुकसान अवलंबून असतं. दुर्दैवाने काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल, असं सांगितलं.
रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी तेथील उपस्थितांशी संवाद साधत कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जास्त फिरत बसण्यापेक्षा जे महत्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत असं सांगितलं.
कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी रत्नागिरी येथे बैठकीदरम्यान दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2021
मदतीचे आदेश तत्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार, असं ते म्हणाले.
मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं होतं, त्यासंबंधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज करणार नाही. सरकार त्यांच्यासोबत आहे, जे करता येणं शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असताना मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय सांगत मोदींवर निशाणा साधला. मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही, असंही ते म्हणाले.
मोदींनी गुजरातला जाहीर केलेल्या मदतीवर बोलताना, मी येथील विरोधी पक्ष बोलतो तसा बोलणार नाही. मी जबाबदारीने बोलणार. पंतप्रधान आपल्याकडे आले नसले तरी ते महाराष्ट्रालादेखील व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. वादळापासून वाचण्यासाठी कायमची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, त्यासाठी मदत करावी अशी विनंतीही यावेळी त्यांनी केली.




