Top Newsराजकारण

पवार कुटुंबीयांच्या दिवाळीत अजित पवारांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दरवर्षी कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करतात. तसेच दिवाळी पाडव्यादिवशी पवार कुटुंबीय बारामतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. यावर्षीही दिवाळी पाडव्यानिमित्त आज सकाळी पवार कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, तसेच रोहित पवार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. दरम्यान, अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत म्हणाले की, अजित पवार यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अजितदादा यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येणे टाळले. अजित पवार यांच्या ताफ्यामधील दोन वाहन चालक आणि तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे पवार कुटुंबाकडून दिवाळी निमित्त होणाऱ्या भेटीगाठीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र शरद पवार यांनी याबाबत स्वत: स्पष्टीकरण देत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, दिवाळीची भेट म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेल किंमतीच्या दरात कपात केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही यांचे दर कमी होणार का? यावर जनतेचे लक्ष लागून आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपातीवर भाष्य केले आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारसोबत बोलत असल्याचे पवार म्हणाले आहेत. बारामतीत स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पवार म्हणाले, पेट्रोल डिझेलच्या दराबाबत नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी आम्ही राज्य सरकार सोबत बोलत आहोत. सरकारला याबाबत मार्ग काढण्यास निश्चितच सुचवलेलं आहे. परंतु केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीची जे देणं लवकर द्यावं. ते दिल्यानंतर लोकांना मदत करण्याचा निर्णय घेणे शक्य होईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

सद्यस्थितीत आपण हळूहळू संकटातून बाहेर निघत आहोत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नेहमीचा कारभार करू. गेल्या दोन वर्षात जे आर्थिक नुकसान झालं ते भरून काढू, अर्थव्यवस्था समाजव्यवस्था सावरण्याची काळजी घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत’

महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे आपल्याला काही पथ्य पाळावी लागली. आता हे संकट हळूहळू कमी होत आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राज्य सरकारने अनेक दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा परिणाम होऊन कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांना भेटावं की नाही भेटावं या विचारात आम्ही होतो. पण लोकांच्या आग्रहामुळे आम्हाला हा कार्यक्रम घ्यावा लागला. कोरोनाबद्दलची संपूर्ण खबरदारी घेऊन शुभेच्छा देण्या-घेण्याचा कार्यक्रम पार पडतोय, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

ईडी, आयकराच्या चौकशीवर मौन

गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांशी संबंधितांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी सूचक मौन पाळलं. अरे काही तरी चांगलं बोला, असं म्हणून शरद पवार यांनी हा विषय टाळला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनो सहकार्य करा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे लोक मला भेटले होते. त्यांनी संप पुढे न्यायचा नाही असं सांगितलं होतं. दिवाळीत नागरिकांना त्रास द्यायचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण काही लोकांनी टोकाची भूमिका घडल्याने हे घडतंय. ८५ टक्के एसटी रस्त्यावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं असं माझं आवाहन आहे. तसेच कोर्टानेही संप करण्यास मनाई केली आहे. कोर्टाच्या निर्णयाचं कर्मचाऱ्यांनी पालन करावं, असंही माझं मत आहे, असं त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button