स्वतःच्या प्रसिद्धीसाठी भातखळकरांचे शरद पवारांवर आरोप : राष्ट्रवादी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप करणार्या अतुल भातखळकर यांच्या तथ्यहिन आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशभरात वाढणारी लोकप्रियता लक्षात घेऊन व देशपातळीवरील नेतृत्व खासदार शरद पवार यांच्यावर बेछूट आरोप करुन अतुल भातखळकर स्वतःची फालतू प्रसिद्धी करुन घेत असल्याचा टोलाही तपासे यांनी लगावला आहे. जन आशीर्वाद यात्रा कोरोना काळात घेणं हे चुकीचं आहे परंतु नैतिकतेचे भान विसरलेली भाजप जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि इतर सर्वांनी मोठं कार्य केले आहे तेच भाजपला बघवत नाही आणि म्हणूनच राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
भातखळकरांचे आरोप
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशीला पाचव्यांदा जाणे टाळले. अनिल देशमुख यांनी त्यांच्या वकिलामार्फत तीन पानी पत्र ईडीकडे पाठवले होते. अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश यांनाही ईडीने समन्स बजावले होते, मात्र तेही चौकशीला उपस्थित नव्हते. दरम्यान भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल देशमुख यांच्या वाटमारीत मुख्यमंत्री आणि शरद पवारांची कितपत भागीदारी होती याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.