मुंबई – सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, ते पिल्लू वळवळ करत होतं, आता आमच्यावरच फुत्कारत आहे. सध्या देशात एक विकृती आहे, एक घृणास्पद राजकारण सुरू असून विकृतीपेक्षा घाणेरडेपणा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचे वाभाडे काढले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांनी बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापान आणि पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर आयोजित बैठकीसाठी पोहचले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, भाजपवर जोरदार निशाणा साधला.
माझे १७० मोहरे फोडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान
हिम्मत आहे तर दाऊदला शोधून का आणत नाहीत. तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग दाऊदच्या मुसक्या का आवळत नाहीत, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, आज इकडे धाड पाडतायेत तिकडे धाड पाडतायेत, याला अटक करतायेत, त्याला अटक करतायेत. मात्र, आता हे खपवून घ्यायचं नाही. आपली एकजूट आपली ताकद आहे. आम्ही कोणावर वार करत नाही, पण वार केला तर आम्ही सोडणार नाही. सरकार पडणार, सरकार पडणार… माझे १७० मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्कारणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर सरकारची ठरली स्ट्रॅटेजी
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री राजीनामा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप लावून धरणार आहे. यावर अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारणार नाही यावर ठाम आहेत. मात्र सभागृहात काय निर्णय घ्यायचा हे सभागृहात ठरेल. कोणाचा राजीनामा स्वीकारायचा हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.
राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकार चालवत असताना जे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत त्यासाठी दोन पावले पुढे मागे होतात. मात्र ज्या मुद्यावर सरकार ठाम आहे त्यावर मागे यायचे कारण नाही, असं अजित पवार म्हणाले.
फडणवीस आक्रमक
तत्पूर्वी, ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज आक्रमक झाल्याचं दिसून आलं. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन फडणवीस आक्रमक झाले. मुंबईच्या खुन्यासोबत व्यवहार केलेल्या मंत्र्याला पाठिशी घालून ठाकरे सरकार काय सिद्ध करु पाहातंय? मुंबईच्या खुन्यासोबतचा व्यवहार महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. दहशतवाद्याशी संबंधित जमिनीचा व्यवहार करुन त्याला सहकार्य करायचच कशाला? असे सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या अधिवेशनात मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा पक्ष संघर्ष करेल असंही ते म्हणाले. ज्या सरकारमध्ये दाऊदप्रती सहानुभूती ठेवणारे लोक ठेवले आहे, त्या सरकारच्या चहापानाला आम्ही जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असंही फडणवीसांनी यावेळी जाहीर केलं.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच एका मुलाखतीत, तुम्ही देशातली सत्ताही घेतली, महाराष्ट्रातलीही तुम्हाला हवी, ग्रामपंचायत, सोसायट्याही तुम्हाला हव्यात, मग आम्ही धुणीभांडी करायची का?, असा टोला भाजपला लगावला होता. त्यावरही फडणवीसांनी आज प्रत्युत्तर दिलं. त्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवावं. पण त्यांच्यातले काही लोक दाऊदकडची धुणीभांडी करतायत. ती आधी बंद करायला लावा. दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही ही जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय, ती आधी बंद झाली पाहिजे.
राज्यात आज अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही अधिवेशनात चर्चा करण्यासाठी तयार आहोत. राज्यातील अनेक मुद्दे मांडण्याची आमची तयारी आहे. पण सरकारनंही हे अधिवेशन नीट सहकार्यानं चालवायला हवं. राज्यातील शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले जात आहेत. राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधीच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले जाणार नाहीत असा शब्द दिला होता. त्यानंतर मीटर कापावे लागतील असे शेवटच्या दिवशी म्हणाले. म्हणजेच त्यांच्या शब्दाला सरकारमध्ये काहीच किंमत नाही हे सिद्ध झालं आहे. ठाकरे सरकार हे सावकारी सरकार आहे, असं फडणवीस म्हणाले.
बेवड्यांना समर्पित सरकार
महाविकास आघाडी सरकार हे फक्त बेवड्यांसाठी काम करतं. मद्य व्यवसायाला हवा तसा पाठिंबा देतं. हे सरकार बेवड्यांना समर्पित असलेलं सरकार आहे, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार ठाकरे सरकारच्या काळात झाला आहे, असाही दावा फडणवीसांनी यावेळी केला. तसंच राज्याच्या इतिहासात ठाकरे सरकारची ओळख आजवरचं सर्वात भ्रष्टाचारी सरकार अशी नोंद केली जाईल, असंही ते म्हणाले.
मोहित कंबोज, गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्या !
अनेक दिवसांपासून भाजप नेते गोपीचंद पडळकर, मोहित कंबोज यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडी येथे हल्ला झाल्याचीही घटना घडली. त्यानंतर आता नवाब मलिकांना टार्गेट केल्यामुळे भाजपा नेते मोहित कंबोज यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या आमदार-खासदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यावर फडणवीसांनी भाष्य केले आहे. मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांचे काळे कारनामे उघड केले म्हणून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तशा धमक्याही त्यांना मिळत आहे. गोपीचंद पडळकर सरकारविरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावर हल्ला करायचा, जीवे मारण्याचा प्रयत्न करायचा हे आम्ही बघितलं आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले होणार असतील त्यांना सुरक्षाही द्यायची नाही असं कसं चालेल. सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असं फडणवीस म्हणाले.