संघटनात्मक बैठकांसाठी आम्ही दिल्लीत; देवेंद्र फडणवीसांचा खुलासा
नवी दिल्ली : राज्यातील प्रमुख नेते दिल्ली दौऱ्यावर असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सत्तांतर होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याबाबत केलेल्या भविष्यवाणीनं अनेकांच्या भूवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नियोजित दौरा सोडून दिल्लीला रवाना झाल्याने चर्चेची खलबतं सुरु झाली.
या सर्व राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खुलासा केला आहे. मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीसाठी आलो आहे. याठिकाणी आमचे संघटनमंत्री आणि इतर सहकारी यांच्यासोबत ४-५ तास बैठक झाली. या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल आणि संघटनात्मक आढावा घेण्यात आला. त्यामुळे बाकी कुठलाही अजेंडा आमचा नाही. कुठली राजकीय चर्चा बाहेर सुरू आहे याची कल्पना नसल्याचं ते म्हणाले.
पक्षांच्या नेत्यांसोबत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली आहे. मात्र, पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमधील संघटनात्मक फेरबदलावरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे नेते बीएल संतोष आणि सीटी रवी यांची भाजप मुख्यालयात भेट घेतली. या नेत्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास चर्चा झाली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
त्याचसोबत मी नारायण राणे यांनी काय विधान केले आहे हे ऐकलं नाही. दिल्लीत आल्यावर आम्ही अमित शाह यांची भेट घेतली. कारण ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा होते. ते आम्हाला मार्गदर्शन करतात असंही फडणवीस म्हणाले. दरम्यान, नागपूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला काही चमत्कार होईल अशी आशा वाटते परंतु असं काही घडणार नाही. याठिकाणी भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.