मुंबई/पुणे : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा अध्याय संपतो ना संपतो तोच आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी अर्थात मुंबै बँकेच्या निवडणुकीची सुरु झाली आहे. मुंबई जिल्हा बँकेच्या ४ जागासांठी आज मतदान होत असून एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. बँकेच्या एकूण २१ जागांपैकी १७ जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. उरलेल्या चार जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.दुसरीकडे ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूकही अंतिम टप्प्यात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर पुणे जिल्ह्यातील ६ जागांसाठी आज मतदान सुरु आहे. पुणे जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे. ४ जागांसाठी एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या आठही उमदेवारांमध्ये अटीतटीची लढाई होणार असल्याचे सांगण्यात येतंय. या निवडणुकीसाठी एकूण १० हजार १९१ मतदार मतदान करणार असून रविवार म्हणजे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
निवडणूक प्राधिकरणाने मतदानासाठी शीव येथील साधना पूर्व प्राथमिक विद्यालय आणि डी. एस. हायस्कूलची निवड केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कैलास जेबले यांनी वरील माहिती दिली असून मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणूनन पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात चोख पोलीस बदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खटाटोप करण्यात येत होता. यामध्ये काही प्रमाणात यश मिळाले. एकूण २१ जागांपैकी १७ जागांवर उमेदवारांची बिनिरोध निवड करण्यात आली. तर ४ जागांवर एकमत न झाल्यामुळे येथे निवडणूक होत आहे. यावेळी कोणाचा गट सरस ठरणार आणि कोणाच्या पदरात अपयश पडणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबै बँकेच्या संचालकपदी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आहेत.
पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांची प्रतिष्ठा पणाला
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे २१ पैकी २१ जागा होत्या, यंदाच्या निवडणुकीत १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर हवेली तालुक्यात एक मैत्रीपूर्ण लढत आहे. उर्वरित ६ जागांसाठी आज मतदान होत आहे. ६ जागा ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी सुरु आहे.
कोणकोणत्या ६ जागांवर मतदान
अ वर्ग मुळशी आणि शिरुर तालुक्यातील दोन जागा
महिला सर्वसाधारण दोन जागा
क वर्ग आणि ड वर्ग प्रत्येकी 1 जागा
बारामती तालुक्यात ४ जागांसाठी होणार मतदान
सहाही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत
बिनविरोध निवड
प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील, “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. १९९१ पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.