भाजपवर मोठी नामुष्की; उत्तराखंडचे मुख्यमंत्री ४ महिन्यात राजीनामा देणार
देडराडून : विधानसभा निवडणूक वर्षावर आली असताना भाजपाने संभाव्य राजकीय नुकसान टाळण्यासाठी उत्तराखंडमध्ये नेतृत्वबदल केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागी तीरथ सिंह रावत यांची नियुक्ती केली होती. मात्र आता अवघ्या चार महिन्यामध्येच तीरथ सिंह रावत यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे.
भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी घटनात्मक अडचणींचे कारण देत तीरथ सिंह रावत यांना राजीनामा देण्याची सूचना दिली आहे. दरम्यान, उत्तराखंडच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत विधानसभा सदस्यांच्या पुढील बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या आमदारांमधूनच पुढील मुख्यमंत्र्याची निवड केली जाईल. तीरथ सिंह रावत हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. यादरम्यान, त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत दोन वेळा चर्चा केली आहे. पौडी येथून लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांनी १० मार्च रोजी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, मुख्यंमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी तीरथ सिंह रावत यांना १० सप्टेंबरपर्यंत विधानसभा सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक आहे.
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या दोन जागा गंगोत्री आणि हल्द्वानी रिक्त आहेत. तेथे पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. मात्र राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्याने सदस्यत्वाचा एक वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत कायदेतज्ज्ञांच्या मते निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर अवलंबून असेल. त्यामुळेच तीरथ सिंह रावत यांना राजीनामा देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर तीरथ सिंह रावत यांची मुख्यमंत्रिपदावर निवड करण्यात आली होती. काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले होते.