Top Newsराजकारण

गोवा घडामोडी : उत्पल पर्रिकरांचा बंडाचा झेंडा; पणजीतून अपक्ष लढणार

माझं काम नव्हतं तर इतर मतदारसंघाचे पर्याय कसे दिले? फडणवीसांना सवाल

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पणजी मतदारसंघातून दावेदारी केली होती. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारत बाबुश मोन्सेरात यांना पणजीतून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता उत्पल पर्रिकर यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा फडकवला असून, त्यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ‘मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करिअरवर खूपजणांनी चिंता व्यक्त केली. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल’, असंही उत्पल पर्रीकर म्हणाले.

याबाबत माहिती देताना उत्पल पर्रिकर यांनी सांगितले की, मी विधानसभेच्या पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीमुळे गोवा विधानसभेच्या निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेनेही उत्पल पर्रिकर हे अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याची घोषणा केल्याने पणजी मतदारसंघातही रंगतदार लढाई होण्याची शक्यता आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता, तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली. तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेरीस त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

माझं काम नव्हतं तर इतर मतदारसंघाचे पर्याय कसे दिले? फडणवीसांना सवाल

उत्पल पर्रिकरांचं काम नसल्याने त्यांना पणजी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारण्यात आली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर यांनी फडणवीसांच्या या आरोपावर पलटवार केला आहे. माझं काम नव्हतं तर इतर मतदारसंघाचे पर्याय कसे दिले? असा सवाल उत्पल पर्रिकर यांनी केला आहे.

उत्पल पर्रिकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत पणजीतून अपक्ष उमदेवार म्हणून लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे पणजीत भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण अपक्ष उमेदवार लढणार असल्याचं जाहीर करतानाच उत्पल यांनी देवेंद्र फडणवीसांवरही पलटवार केला आहे. मी कोणत्याही पक्षाचे पर्याय स्वीकारले नाहीत. माझे वडील फायटर होते. त्यामुळे मीही लढायचं ठरवलं आहे. माझं पणजीत काम नव्हतं तर मला इतर ठिकाणचे पर्याय का देण्यात आले? असा सवाल त्यांनी केला.

मनोहर पर्रिकरांचा मुलगा म्हणून तिकीट मागायचे असते तर मागच्यावेळीच मागितलं असतं. मात्र मागच्यावेळी पार्टीने जे सांगितलं तेच मी केलं. वडील सक्रिय असताना मी कधीच पुढे पुढे केलं नाही. वडिलांचं वजन वापरलं नाही. आता पक्षाने पणजीत असा उमेदवार दिला त्यावर बोलायला लाज वाटते. त्यामुळे मला पर्याय राहिला नाही मी निवडणूक लढत आहे. माझ्या वडिलांसोबतचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांना शिवसेना आणि आपच्या ऑफरबाबतही विचारण्यात आलं. त्यावर माझ्या पार्टीच्या ऑफर घेतल्या नाही मी इतर पक्षाच्या ऑफरचा विचारही करू शकत नाही. मला लोकांना पर्याय द्यायचा आहे. माझ्यासाठी पर्याय मागत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

अपक्ष निवडणूक लढत आहात, तर तुम्ही भाजप सोडणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्या मनात भाजप रोज असणार. भाजपने मला सोडलंय का ते तुम्ही त्यांनाच विचारा, असं सांगत उत्पल यांनी भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला.

मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले.

काँग्रेसला मत हे भाजपला मिळालेले मत; तृणमूलचे अभिषेक बॅनर्जींची टीका

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी गोमंतकीयांची दिशाभूल केल्याबद्दल आणि गोव्याच्या लोकांच्या व्यापक हितासाठी युती करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल काँग्रेस आणि त्यांचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांच्यावर टीकास्त्र सोडले. गोवा ‘टीएमसी’चे युवा अध्यक्ष जयेश शेटगावकर आणि गोवा टीएमसी महिला उपाध्यक्षा प्रतिभा बोरकर यांच्या उपस्थितीत पणजी येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली.

त्यांच्या सुरुवातीच्या विधानात, अभिषेक बॅनर्जी यांनी ‘टीएमसी’ विरोधी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाकारला, ज्यामुळे भाजपला फायदा होत आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ऑक्टोबरमध्ये सर्व समविचारी पक्षांना (भाजपविरोधी शक्तींना) गोव्यातील भाजपला हुसकावून लावण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. ‘टीएमसी’ मार्गाबाहेर गेली आणि स्वतःहून सर्वांपर्यंत पोहोचली. मगोपने सकारात्मक प्रतिसाद दिला तर इतरांनी प्रतिसाद दिला नाही. यावर सडेतोड उत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘आम्हाला काँग्रेसची मते फोडायची असती, तर आम्ही पंजाब, राजस्थान किंवा इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये गेलो असतो. पण आम्ही कुठे गेलो? आम्ही त्रिपुरा, मेघालय येथे गेलो आणि भाजपचे सरकार असलेल्या गोव्यात आलो.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधताना ‘एआयटीसी’चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले, ‘ चिदंबरम यांचा दावा आहे की, त्यांना कोणताही ठोस प्रस्ताव दिला गेला नाही. गोव्यातील जनतेची आणि देशाची दिशाभूल करत आहे. ढोंगीपणाला मर्यादा असावी. निर्विकार चेहऱ्याला मर्यादा असावी. आज त्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. मला तुम्हाला तथ्ये सांगायची आहेत. तृणमूलचे उपाध्यक्ष पवन वर्मा यांनी २४ डिसेंबर रोजी त्यांच्या दिल्लीतील घरी जाऊन त्यांना गोमंतकीयांच्या फायद्यासाठी युती करण्याचे आवाहन केले. पण स्वत:च्या क्षुल्लक उद्दिष्टांच्या वरती जाण्यात ते अपयशी ठरले.

ते पुढे म्हणाले, काँग्रेसची भाजपसोबत अस्पष्ट युती आहे. काँग्रेसला मिळालेले प्रत्येक मत हे थेट भाजपला मिळालेले मत आहे. जर काँग्रेस भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरली तर चिदंबरम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा देणारे पहिले व्यक्ती व्हावे. आलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्स यांनी ‘टीएमसी’ का सोडली याबद्दल विचारले असता, अभिषेक म्हणाले, ज्यांना गोव्यासाठी लढायचे आहे ते राहू शकतात. ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी लढायचे आहे, ते सोडून जाऊ शकतात.

पुढे, लुइझिन फालेरो फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने नाराज आहेत का, असा प्रश्न विचारला असता, अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, ‘कोणतीही नाराजी नाही. तिकीट मिळाल्यावर कोणी नाराज झाल्याचे मी कधी ऐकले नाही. आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन फालेरो हे एक सैनिक आहेत आणि ते विश्वासघातकी -इन-चीफ (विजय सरदेसाई) विरुद्ध लढणार आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गोव्यात प्रचाराला येणार : संजय राऊत

शिवसेनेने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेवेळी संजय राऊत यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते आणि युवासेनेचे प्रमुख तसेच मंत्री आदित्य ठाकरे येणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते इथे प्रचाराला येतील. कॅबिनेटमंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वत: प्रचाराला उतरतील. गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय, शिवसेनेला अनेक मतदारसंघांमधून चांगला प्रतिसाद मिळतोय. गोव्याच्या राजकारणात शिवसेना नवीन पक्ष नाही. आपण मागील काही वर्षांपासून पाहत आहात, जरी निवडणुकीत आम्हाला यश मिळाले नसले तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करत आहे. गोव्यातील निवडणुका आम्ही २०१७ साली देखील लढवल्या होत्या, यावेळी गोव्याचे राजकारण आणि गोव्याच्या निवडणुका एकंदरीत वातावरण, हे काय फार आशादायी दिसत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालेल्या पत्रकार परिषदेत मी सांगितलं, की हिंदी भाषिक पट्ट्यात आयाराम-गयाराम हा शब्द प्रचलीत आहे. पण गोव्याच्या बातीत म्हणायचं तर आलेमाव गेलेमाव हा एक नवीन राजकारणातील वाकप्रचार दिसत आहे. कोण कधी आले आणि कोण कधी गेले, कधी कोण बंड करेन याचा आता भरवसा नाही. त्याही परिस्थितीत शिवसेना ही निवडणूक लढते आहे. गोव्यातील प्रस्थापितांना जर घरी बसावयचे असेल, ही आलेमाव गेलेमाव संस्कृती जर मोडून काढायची असेल, तर जनतेतील सामान्यातील सामान्य उमेदवारांना उमेदवारी गोव्यात द्यायची. बाळासाहेब ठाकरे यांनी सतत सामान्य माणसाला राजकारणात आणून ताकद दिलेली आहे. अशा पद्धतीचा एक नवीन प्रवाह गोव्यात सुरू करावा. म्हणून त्या त्या मतदारसंघातील सामान्य चेहरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचे आम्ही ठरवलेले आहे, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना साधारण १० ते १२ जागा लढेल. आज नऊ उमेदवारांची घोषणा आम्ही करत आहोत. उरलेल्या तीन मतदारसंघाची उद्या आम्ही घोषणा करू. आम्ही ठरवलय की या वेळी प्रत्येक मतदारसंघात अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीने निवडणुका लढवेल. गोव्याच्या जनतेचा आवाज, स्थानिकांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, भ्रष्टाचार, स्थानिक राजकारण्यांची दंडेलशाही, हे सगळं जर थोपवायचं असेल तर शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायलाच पाहिजे आणि गोव्याची जनता यंदा शिवसेनेला संधी देईल अशी मला खात्री आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

तृणमूलची ‘खरेदी प्रक्रिया‘ गोव्याने ओळखली; फडणवीसांचा हल्लाबोल

गोव्याने तृणमूल काँग्रेसची खरेदी प्रक्रिया पाहिली असल्याचा घणाघात भाजप नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गोव्यात तृणमूलकडून खरेदी सुरु असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस यांनी गोव्यातून तृणमूल काँग्रेसवर घणाघात केला आहे. फडणवीस प्रतापसिंह राणे यांना भेटले तेव्हा त्यांच्याकडे बॅग होती यावरुन भाजपची खरेदी प्रक्रिया सुरु असल्याचा आरोप करण्यात येत होता. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, मी भेटतो आहे त्यांच्यासारखा बॅग घेऊन खरेदीसाठी आलो नाही. तृणूल काँग्रेस गोव्यात खरेदी करण्यासाठी आली आहे. गोव्याच्या राजकारणात प्रतापसिंह राणे गेल्या ५० वर्षांपासून आहे. त्यामुळे त्यांना भेटायला जाण्यात काय अडचण असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान फडणवीस पुढे म्हणाले की, आम्हाला सूटकेसची आवश्यकता नाही. नारदा आणि शारदाचे घोटाळे आम्ही करत नाही. त्या घोटाळ्यातील पैसा त्यांच्याकडे आहे त्यामुळे ते बॅग घेऊन आले आहेत गोव्यातील सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकजण सांगतो आहे की, कशी खरेदी आणि विक्री झाली असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी ते काहीही बोलू शकतात. कोणाचे कोणाशी साठलोट आहे. हे जगाला माहिती आहे. ही मंडळी एका राज्यात भांडतात दुसऱ्या राज्यात एकत्र येतात आणि तिसऱ्या राज्यात भांडतात असे सोयीचे राजकारण आहे. तसेच अभिषेक बॅनर्जीसुद्धा सोयीच राजकारण करत आहेत. तृणूल काँग्रेस ही हिंदूविरोधी पार्टी आहे. अशा प्रकारची इमेज बंगालमधील दंग्यांनंतर झाले आहे. विशेषता निवडणुकीनंतर हिंदूंना टार्गेट करुन मारण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तोंडावर बोट ठेवून गप्प होत्या हे सर्वांनी पाहिले असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

गोव्यात एमजी पक्ष हा सुद्धा तृणमूलसोबत गेला आहे. जे लोकं हिंदूंवर अत्याचार करत आहेत जे लोकं लोकशाही मानत नाही. अशा लोकांसोबत एमजी गेल्यामुळे त्यांचे मत भाजपला मिळणार आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button