नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसोबतच आता गोव्यातही निवडणुकीचा प्रचार तीव्र झालाय. भाजप आमदारांचे राजीनामे हे गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत, त्यामुळे प्रमोद सावंत यांच्यावरही प्रचंड दबाव वाढत आहे. खरे तर माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरीची तयारी केलीय. उत्पल यांनी गोव्याची राजधानी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर भाजपने उत्पल यांना तिकीट न दिल्यास ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, उत्पल पर्रिकरांना सर्वोतोपरी शिवसेना मदत करणार, ते सांगतील ती मदत करू. आम्हीच कशाला इतर देखील अनेक पक्ष मदत करतील. पर्रिकर हे राजकीय पक्षाच्या किंवा राजकारणाच्याही पलिकडचे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर जर अन्याय होत असेल आणि ते धाडसाने पुढे येऊन काही करणार असतील, तर शिवसेनाच कशाला इतर देखील समाज, इतर देखील राजकीय पक्ष उत्पल पर्रिकरांना मदत करतील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
उत्पल यांनी त्यांचे वडील मनोहर पर्रिकर यांची जागा असलेल्या पणजीतही घरोघरी प्रचार सुरू केलाय. २०१९ मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपने या जागेवरून सिद्धार्थ श्रीपाद कुंकळणीकर यांना तिकीट दिले होते. मात्र, त्या निवडणुकीत काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात विजयी झाले आणि त्यांनी ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली. मात्र, २०१९ मध्ये बाबूश यांच्यासह काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले. एवढेच नाही तर बाबूश यांच्या पत्नी जेनिफर यांना सरकारमध्ये महसूल खात्याचा महत्त्वाचा पदभार देण्यात आला. बाबूश ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे, तर उत्पल यांना येथून निवडणूक लढवायची आहे.
मात्र ही जागा बाबूश यांच्याकडून उत्पल यांना दिल्यास गोव्यात पक्ष अडचणीत येण्याची भीती भाजपला आहे. खरे तर बाबूश हे पणजीचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी तळेगावच्या आमदार आहेत. त्यांचा मुलगा पणजीचा महापौर आहे. एवढेच नाही तर बाबूश यांचा प्रभाव आजूबाजूच्या ५-६ विधानसभा जागांवर आहे. उत्पल यांनी यावेळी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही उत्पल यांच्या संभाव्य उमेदवारीवर सूचक विधान केलंय. ते म्हणाले, “ते एका नेत्याचे पुत्र आहेत म्हणून पक्ष कोणालाही तिकीट देऊ शकत नाही. आता या जागेवरील कोण निवडणूक लढवणार याचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
उत्पल पर्रिकर पणजीमधून निवडणुकीसाठी उभे राहिले तर…; संजय राऊतांचे सूचक विधान
उत्पल पर्रिकरांचे वडील मनोहर पर्रिकर हे गोव्यातील प्रमुख नेते होते. भाऊसाहेब बांदोडकरानंतर गोव्यावर त्यांचा मोठा प्रभाव होता. या गोव्यात भाजपचे संघटन वाढवण्यात रुजवण्यात पर्रिकरांचा महत्वाचा वाटा होता. पर्रिकरांनी गोव्याला आकार देण्याचा प्रयत्न केला, विकास केला नक्कीच. पर्रिकरांकडे दूरदृष्टी होती, गोव्यासारख्या लहान राज्यातील हा माणूस देशाचा संरक्षणमंत्री झाला. पण त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांच्या मुलाने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ज्या पद्धतीने त्यांचा अपमान केला जातोय, अपमानित केले जातेय, ते जनेतला आवडलेले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
उत्पल पर्रिकर यांच्याबाबतीत जे भाजप वागतेय, हे गोव्याच्या जनतेला काही आवडलेले नाही. पण, शेवटी निर्णय कोणी घ्यायचा आहे, तर उत्पल पर्रिकरांनी घ्यायचा आहे. हिंमत दाखवा, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही लढायला समोर या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. घरात बसून लढाया होत नाहीत किंवा कागदावर चार भिंतींमध्ये, तुम्ही हिंमत असेल तर समोर या. आव्हान द्या. मी खात्रीने सांगतो जर उत्पल पर्रिकर लढण्यासाठी बाहेर पडले आणि पणजीमध्ये निवडणुकीसाठी उभे राहिले, तर ते निवडून येतील आणि गोव्याची जनता त्यांच्या पाठीशी राहील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी, राऊत म्हणतात, गोव्यात काँग्रेस ४० पैकी ४५ जागा जिंकेल
दरम्यान, शिवसेना साधारण १४-१५ जागा लढेल अशी आमची एक भूमिका आहे. कोणाबरोबरही युती होत नाही आणि होण्याची शक्यता नाही. कारण, काँग्रेस आणि भाजपने आपआपले उमेदवार दिलेले आहेत. नक्कीच काँग्रेसने आम्हाला काही जागा देण्याचा प्रयत्न केला. दोन किंवा तीन जागा ते आम्हाला देत होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आहे. आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे एकत्र येऊन गोव्यात निवडणूक लढवू. साधारण दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल पटेल हे गोव्यात येतील, मी देखील असेल आणि आम्ही आमच्या जागा जाहीर करू, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात होता. मात्र, काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना चांगलाच धक्का बसल्याचे दिसून येते. कारण, राऊत यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे, असे म्हटले. काँग्रेसबरोबर आमची काही काळ चर्चा नक्कीच झाली. पण गोव्यातली काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे. पण, ठीक आहे त्यांना तरंगू द्या, मग तडाखे बसतात, असा टोला राऊत यांनी लगावला. शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र आहेत. काँग्रेससाठी आम्ही प्रयत्न केला. त्यांच्यासोबत चर्चा केली. पण त्यांना असं वाटतं ४० पैकी ३५ जागा मिळतील. पैकीच्या पैकी जागा त्यांना गोव्यात मिळू शकतात असं त्यांना वाटतं. इतका आत्मविश्वास एखाद्या पक्षावला असेल तर आपण त्यांच्या आत्मविश्वासाला कशाला तडा द्यायचा? त्यांनी ४० पैकी ४५ जागा जिंकल्या तरी हरकत नाही, असा खोचक टोमणा राऊत यांनी काँग्रेसला हाणला.