Top Newsराजकारण

पर्रिकरांचा मुलगा आहे म्हणून उत्पलला भाजपची उमेदवारी नाही! : फडणवीस

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल हे उमेदवारी न मिळाल्यास भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. मनोहर पर्रिकर यांनी गोव्यामध्ये भाजपला स्थापित करण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. मात्र केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपत उमेदवारी मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेऊ शकत नाही. तो निर्णय आमचं पार्लामेंट्री बोर्ड आहे, ते त्यासंदर्भातील निर्णय घेईल.

मनोहर पर्रिकर यांच्या मुलाच्या उमेदवारीबाबत भाजपनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. असं असतानाही देखील त्यांचे सुपुत्र उत्पल हे पणजीमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त असून त्यांनी आपलं प्रचारकार्य जोरात सुरु ठेवलेलं आहे. त्यामुळे भाजपनं उमेदवारी दिलेली नसतानाही उत्पल पर्रिकर हे नेमकं काय करु पाहत आहेत, अशा चर्चांना ऊत आलेला आहे.

उत्पल पर्रिकर यांनी नुकतीत अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत काय झालं, ते मला माहीत नाही. त्याची माहिती घेतल्यानंतर मी माझं मत व्यक्त करेन. मनोहरभाईंनी गोव्यात भाजप रुपवली. त्यांचं गोव्यातील काम हे मोठंच आहे. पण पर्रिकरांचा मुलगा आहे. म्हणून उत्पल यांना तिकीट दिलं जाऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.

गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. लोकसंख्या आणि विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य असलेल्या गोव्यामध्ये यावेळी भाजपा आणि काँग्रेस, मगोप या पारंपरिक प्रमुख पक्षांसोबतच आप, तृणमूल काँग्रेस हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतरेही सुरू आहेत. राज्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपामधूनही आऊटगोईंग सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर उत्पल पर्रिकर काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button