इतर

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान

मुंबई : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानं खूप मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी देखील झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात सांगोला परिसरात गारांचा पाऊस झाला. पंढरपूर रोड, बुरांडे वस्ती, सावंत वस्ती, बिलेवाडी व सांगोला परिसरात जोरदार गारांचा पाऊस झाला. दुपारी साडेतीन ते साडे चार या तासाभरात चांगलीच गारपीट झाली. ऐन उन्हाळ्यात सुरू झालेला सोसाट्याच्या वारा आणि गारांचा अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी त्रेधतिरपीट उडाली.

बीडमधील धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यात आसोला येथील शेतीचे खचून प्रचंड नुकसान झाले. तर जाहागीर मोहा येथे शेतीची मशागत करण्यासाठी गेलेला टेलर व जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेले फळबागांचेही नुकसान झाले. धारूर तालुक्यात अवकाळी झालेल्या पावसाने छोट्या नदी नाल्यांना पाणी आले आहे. परळी तालुक्यातील शिरसाळा परिसरामध्ये या चौकडी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले तर धारूरच्या घाटामधल्या नदीचे पात्र भरून वाहताना पाहायला मिळालं. पहाडी पारगाव परिसरामध्ये सुद्धा जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील डोनगाव शहरासह देऊळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वत्र सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे काही भागात तुरळक पावसाला सुरुवात झाली. डोनगाव परिसरात वादळी पाऊस सुरु झाला आहे. यामुळे मात्र शेतात कांदा ,गहू काढणाऱ्या शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली.

नांदेड जिल्ह्यात शेतात काम करत असताना वीज पडून एक महिलेचा मृत्यू झाला आहे तर इतर तीन महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे ही घटना घडली. जिल्ह्यात सध्या सर्वत्र शेतकरी वर्गाकडून मान्सूनपूर्व मशागतीचे कामे चालू आहेत. या दरम्यान मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरात अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वीज पडून मुगट येथील लक्ष्मीबाई बालाजी वारचेवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर रेणुका मेटकर,अर्चना मेटकर,इंदूबाई लोखंडे या तीन शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्यात.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील माहेर जवळा, चिंचोली, पिंपरी ,आवलगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास आलेल्या पावसाने एका तासात शेतात पाणीच पाणी केलं. दरम्यान या पिकाची आंबा मोसंबी आणि इतर फळपिकांना मोठा फटका बसलाय.

लातूर जिल्ह्यातील अनेक भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने मोठा कहर केला आहे. जिल्ह्यात वीज पडून आणि पाण्यात वाहून जाऊन १९ जनावरे दगावल्याची माहिती समोर आली होती. काल दुपारी लातूर शहर, लातूर ग्रामीणमधील जळकोट, निलंगा, औराद शहजानी, देवनी, अहमदपुर, चाकूर या तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने मोठं नुकसान केलं आहे. औराद शाहजनी, उस्तूरी, कासार बालकुंदा भागात वीज पडून तीन बैलांचा मृत्यू झाला. निलंगा भागातही तीच स्थिती होती. कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यामुळे नदी नाले भरून वाहू लागले आहेत. यामध्ये सात जनावरे वाहून गेली आहेत. जळकोट तालुक्यातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली होती. यामुळे या भागातील आंबा फळबागेला फटका बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button