मुक्तपीठ

नाकाला झोंबलेल्या मिरच्या

- भागा वरखडे

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीत त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अस्तित्वावर तसंच काँग्रेसच्या नेतृत्वावर काही प्रश्‍न उपस्थित केले. त्यामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. ममता यांनीच उपस्थित केलेले काही प्रश्‍न आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलेली टीका काँग्रेसच्या नाकाला मिरच्या झोंबवणारी असली, तरी त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान असणारा, पंतप्रधानपदी राहिलेल्या दोघांच्या प्राणाचं बलिदान दिलेल्या, देशाला विकासाच्या वाटेवर नेणार्‍या आणि अगदी गाव-खेड्यापर्यंत पसरलेल्या काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती पाहता त्यातून तो सावरू शकेल का, हा खरा प्रश्‍न आहे. संघटनात्मक बांधणीऐवजी व्यक्तिकेंद्रित आणि दरबारी राजकारण करणारा हा पक्ष नंतरच्या काळात बदलती सामाजिक आणि आर्थिक रचना समजून घेण्यास कमी पडला. पूर्वी सत्तेच्या आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर प्रादेशिक नेत्यांचं खच्चीकरण करता येत होतं. आता ते शक्य नाही, तसं केलं, तर उरला सुरला पक्षही संपून जाईल, याचं भान कॉंग्रेसश्रेष्ठींना राहिलेलं नाही. पक्षश्रेष्ठीचा दबाव, आदरयुक्त भीती राहिलेली नाही. बांडगुळांना शक्ती समजून त्यांना घाबरून कारभार होत असल्यानं शरद पवार म्हणतात, त्याप्रमाणं काँग्रेसची अवस्था पडक्या वाड्यातल्या मालकासारखी झाली आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. गेल्या दहा वर्षांत कॉंग्रेस ९० टक्के निवडणुका हरली आहे. विरोधी पक्षाचं नेतृत्व करणं हा काही काँग्रेसचा दैवी अधिकार नाही, असा हल्ला त्यांनी चढवला आहे. कधी काळी संसदेच्या सभागृहात कायम बहुमतात असणार्‍या काँग्रेसला गेल्या दोन निवडणुकांत लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवता येण्याइतक्याही जागा संपादन करता आलेल्या नाहीत, इतकी या पक्षाची वाताहत झालेली आहे. गेल्या साडेतीन-चार दशकांत या पक्षाची रीतसर संघटनात्मक बांधणी झालेली नाही. त्यासाठी आवश्यक असणार्‍या पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत. नवीन कार्यकर्त्यांची ताज्या दमाची मोठी फौज उभारली गेलेली नाही. पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांमुळं पक्षाला किती राज्यं जिंकता आली आणि जिंकलेली किती राज्यं टिकविता आली, हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

गांधी कुटुंब तसंच काही नेते आणि त्यांच्या कुटुंबापुरता हा पक्ष मर्यादित झाला. पक्ष-संघटनेची वीण उसवली आणि कार्यकर्ता पक्षापासून दुरावत गेला.२००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला फारसं यश मिळालेलं नाही. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांतून अवघा एक खासदार निवडून येतो. विधानसभेच्या जागा बोटावर मोजण्याइतक्या येतात, तरीही पक्ष अंतर्गत गटबाजीतून बाहेर यायला तयार नाही. गेल्या सात वर्षांत पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशात जे यश मिळालं होतं, ते पक्षश्रेष्ठींपेक्षा प्रादेशिक नेतृत्वामुळं होतं. त्याचा पक्षाला विसर पडला. सत्तेत येण्याची स्वप्नं पाहायलाही हरकत नाही; परंतु त्यासाठी संघटन असावं लागतं. बुथपर्यंतची यंत्रणा असावी लागते. त्याचाच पक्षाकडं अभाव आहे. कॉंग्रेस कमकुवत होत गेल्यानं संयुक्त पुरोगामी आघाडीही कमकुवत होत गेली. भाजपविरोधकांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतलेला नाही. गेल्या सात वर्षांत निवडणुकांचा अपवाद वगळता संयुक्त पुरोगामी आघाडीच्या किती बैठका झाल्या आणि त्यात देशाच्या प्रश्‍नांवर आणि सरकारला घेरण्याच्या विषयावर काय केलं, याचं उत्तर या आघाडीच्या अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांच्याकडंही नसेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button