नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट आठवड्याभरानंतर शनिवारी अनलॉक करण्यात आलं आहे. राहुल यांच्यासोबत पक्षाच्या इतर नेत्यांची ट्विटर अकाऊंट्सदेखील अनलॉक करण्यात आली आहेत. काँग्रेसमधील सुत्रांनी ही माहिती दिली.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ट्विट हटवलं होतं. पण आता त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं होतं.
एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं फोटोवर आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पीडितेच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वकील विनीत जिंदल यांनी केली होती.
ट्विटर ही सोशल नेटवर्किंग साइट पक्षपाती आहे. माझं ट्विटर अकाउंट तात्पुरतं बंद करण्यात आलं. ट्विटर अशी कृती करून भारताच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करीत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. आमचं राजकारण कसं असावं हे ट्विटर कंपनी ठरवू पाहात आहे. त्या कंपनीचं हे धोरण एक राजकीय नेता म्हणून मला मान्य नाही. ट्विटरची ही कृती म्हणजे देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर घाला आहे. मला ट्विटरवर २ कोटी फॉलोअर आहेत. माझे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद करून ती कंपनी या कोट्यवधी लोकांचा मतप्रदर्शनाचा हक्क नाकारत आहे. ट्विटर हे एक तटस्थ व्यासपीठ आहे, असं सांगितलं जाते. त्याला या गोष्टींनी तडा गेला आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती.