केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्री तसेच आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नितीन गडकरी यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये गडकरी म्हणाले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोविडची सौम्य लक्षणे दिसत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व नियमांचे पालन करत मी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. मी घरीच होम क्वारेंटाइन झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ला आयसोलेट करून चाचणी करून घ्यावी.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचीत घट झाली आहे. तर मुंबईमध्येही आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक दिसून आले.