Top Newsराजकारण

निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरेंचा थयथयाट; चंद्रकांत पाटलांचा टोला

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण हे दसऱ्याच्या भाषणासारखेच होते. एखाद्या माणसाला आपली चूक समजली पण मान्य करता येत नसेल तर निराशेतून तो थयथयाट करतो आणि दुसऱ्याला चूक म्हणतो तसा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडला. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेली. तब्बल ४१ नगरपंचायतींमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. या निराशेतून सोडणार नाही, दाखवून देईन, आमच्या जिवावर तुम्ही मोठे झालात असे मुख्यमंत्री बोलत आहेत. पण मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सोमवारी ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

आपण हिंदुत्व सोडले नाही असे उद्धव ठाकरे यांना सांगायचे असेल तर त्यांनी ते काँग्रेसला सांगावे. मौलाना आझाद महामंडळाला निधी वाढवून देता पण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मात्र निधी देत नाही. त्यामुळे ज्या अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू केला आहे. त्यांनाही हिंदुत्व सोडले नाही असे सांगावे, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारे बोलत आहेत ते पाहता पटोले यांच्या मानसिक तपासणीची गरज आहे. त्यांच्या राजकारणाचा स्तर किती घसरला आहे याचा काँग्रेस पक्षाने विचार करावा. नाना पटोले यांच्या वृत्तीचा आपण निषेध करतो. भाजपातर्फे राज्यात ठिकठिकाणी पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

एका प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा कोणताही प्रस्ताव नाही व तसा काहीही निर्णय झालेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button