Top Newsराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यपालांना भेटणार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (मंगळवार, दि. ११ मे) संध्याकाळी पाच वाजता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि समितीचे इतर सदस्य राज्यपालांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे, ते पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत सांगितलं होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता हा मुद्दा थेट राष्ट्रपतींकडे मांडत आहेत. राज्याच्या विधीमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता पुन्हा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्यात येत आहेत.

जवळपास वर्षभरानंतर राज्यपाल भगत कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे. विमान प्रवासावरुन मानापमान नाट्य, राज्यपाल नियुक्त सदस्य, राज्यपालांनी लिहिलेलं पत्र, कोरोना आणि कंगाना असे अनेक वाद गेल्या वर्षभरात राज्यपाल आणि ठाकरेंमध्ये रंगले होते. त्यामुळे ही भेट कशी होते, या भेटीत काय घडतं, याकडे सर्व राजकारणी नेते लक्ष लावून बसले आहेत.

राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी रद्द केला. गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं न्यायालयाने म्हटलं. मात्र मराठा आरक्षणांतर्गत आतापर्यंत झालेले प्रवेश रद्द होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध असल्याचेही न्यायालयाने नमूद केलं आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button