राजकारण

उद्धव ठाकरे पार्टटाइम मुख्यमंत्री, महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस हवेत; भाजप नेत्याचे वक्तव्य

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पार्टटाइम मुख्यमंत्री आहेत. फुलटाइम नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहिती झाले आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या फुलटाइम मुख्यमंत्र्यांची गरज आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी म्हटले आहे.

मुंबईत भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना सी. टी. रवी यांनी सदर वक्तव्य करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. आजचे मुख्यमंत्री पार्टटाइम आहे. फुलटाइम नाहीत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे, या शब्दांत रवी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीत हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदूंना रोज अपमानित व्हावे लागत आहे, असे आरोप करत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार भ्रष्टाचारांचा अड्डा बनला आहे. हे सरकार महाविकास आघाडी नाही, तर महाराष्ट्र विनाश आघाडी आहे. जो पक्ष हिंदू रक्षण करण्यासाठी बांधिल होता, तो पक्ष आता परिवार पार्टी झाला आहे. एक बारामती, दुसरी इटली आणि तिसरी ठाकरे कुटुंबाची पार्टी झाली आहे. केवळ घराणेशाही पुढे नेण्यासाठीच काम होत आहे, अशी घणाघाती टीका रवी यांनी यावेळी बोलताना केली.

महाराष्ट्राच्या विकासाची कामे होत नाहीत. राज्यातील जनतेने नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या नावाने मतदान केले होते. सत्तेतच यायचे असेल विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा, आमचे तुम्हाला खुले आव्हान आहे. जनतेने भाजपला मतदान केले आहे. पण शिवसेनेने लोकांचा कौल झुगारला. त्यांनी केवळ भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे. संधीसाधूंच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केले आहे. हा मतदारांचा अपमान आहे, या शब्दांत रवी यांनी हल्लाबोल केला. दरम्यान, आपला पक्ष देशासाठी काम करतो. काँग्रेस व्यक्तीसाठी काम करतो. म्हणून आपण भारत माता की जय म्हणतो. तर ते सोनिय गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद आणि प्रियंका गांधी जिंदाबाद म्हणत असतात, अशी टीकाही रवी यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button