
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अनिल परब यांच्यासोबत मंगळवारी बैठक झाली होती. या बैठकीत अंतरिम पगारवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत पगारवाढीवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर आता हा प्रस्ताव घेऊन अनिल परब हे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पोहोचले आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन परब पगारवाढीच्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे येत मोठा निर्णय घ्यावा लागल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब आज संध्याकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील १५ दिवसांपासून ठाण मांडून आहेत. अशावेळी काल पडळकर, खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अनिल परब यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत अंतरिम पगारवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत पगारवाढीवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर आता हा प्रस्ताव घेऊन अनिल परब हे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पोहोचले आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन परब पगारवाढीच्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?
एसटी कर्मचाऱ्याचा पगार किमान ५ हजार तर कमाल २१ हजार करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. गेल्या १०-१२ वर्षात नव्याने लागलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी आहे. प्रामुख्याने या कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ दिली जाईल. उदा. ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन साडेबारा हजार रूपये आहे, ते साडे अठरा हजार रूपयांच्या आसपास करण्याचा विचार एसटी महामंडळ प्रशासन करत आहे. दुसरीकडे ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन ५० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कमी वेतन वाढ दिली जाईल. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगाराची हमी
प्रत्येक महिन्याच्या ५ ते १० तारखेच्या आधी पगार देणार, असा सरकारचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे.
संप मिटवण्यासाठीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा : पडळकर
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याच्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती संपात उतरलेले भाजपा नेते गोपिचंद पडळकर यांनी दिली. पडळकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आम्ही अनेक मुद्दे राज्य सरकार समोर मांडले. अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव असो किंवा विलीनीकरणाचा असो एकंदरीत चर्चा सकारात्मक झालेले आहे. विलीनीकरणाच्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत. संध्याकाळी सहा वाजता याबाबत अधिकृत निर्णय होईल तो जाहीर केला जाईल, असे पडळकर यांनी सांगितले.
खासगीकरणाच्या दिशेने पाऊल
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारकडून सुरू असला तरी आणि एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार नाही, असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात खासगीकरणाच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन राज्यभरातील बससेवा ठप्प झाली असतानाच विद्युत बस भाडेतत्त्वाने घेण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला महामंडळाने ९ नोव्हेंबरला ‘वर्क ऑर्डर’ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. एसटी महामंडळाच्या मालकीची ‘शिवाई’ विद्युत बसची बांधणी रखडलेली असतानाच खासगी विद्युत बससाठी थेट ‘वर्क ऑर्डर’ देण्याचा प्रकार पाहता, हे खासगीकरणच असल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. खासगी शिवशाहीच्या धर्तीवर महामंडळाच्या या बस धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
व्हायरल मेसेजमुळ गोंधळ, पडळकर-खोतांच्या भूमिकेवर संशय
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी आझाद मैदानात एक नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सुरुवातीपासूनच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांसोबत हे दोन्ही नेते उपस्थित होते. पण, एका व्हायरल मेसेजमुळं या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर संशयाचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. व्हायरल मेसेजमध्ये हे दोन्ही नेते मॅनेज झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तुमचा विश्वास नसेल तर आम्ही घरी जातो, असं यावेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितलं. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी खोत व पडळकर यांना अडवलं आणि त्यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एका व्हायरल मेसेजमुळे पडळकर आणि खोत यांच्यावर संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, आता सर्व प्रकरण शांत झालं आहे.
आंदोलन रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं; सदाभाऊ खोत
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सदाभाऊ खोत यांनी एक सूचक विधान केलं आहे. आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं, असे ते म्हणाले. दरम्यान, एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने दिलेल्या प्रस्तावावर एसटी कर्मचारी सकारात्मक असल्याची माहिती मिळतीये, त्यामुळे आता हा संप लवकरच मिटणार असल्याचं बोललं जात आहे.




