Top Newsराजकारण

मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा मोठा निर्णय

पुणे : मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहे. त्यामुळे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता. तर काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती. स्वत: खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही संभाजी छत्रपती यांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ३ डिसेंबर २०१९ मध्ये ट्विट करून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. त्यांनी याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याकडे ही मागणी केली होती. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील हीच मागणी लावून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी निवेदन दिले होते. मराठा समाजाने आरक्षणासाठी शांतीपूर्ण आंदोलन केले. त्यावेळी सहभागी युवकांवर तत्कालीन भाजप सरकारनं दाखल केले. आता ते गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. एकही तरुण या गुन्ह्यांमुळे शिक्षण, नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी योग्य पाऊल उचलावे, असं आवाहनही मुंडे यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button