‘भानामती’च्या संशयावरून दलित महिला, वृद्धांना मारहाण करणाऱ्या १२ जणांना अटक
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १२ किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडली. जिवती पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सापळा रचून १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सुग्रीव शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, दादाराव कोटंबे, बालाजी कांबळे, अमोल शिंदे, गोविंद येरेकर, केशव कांबळे आणि सुरज कांबळे अशी या आरोपींची नावे आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार संतोष अंबिके यांनी फरार आरोपी रात्री गावात झोपण्यास येतील या दृष्टीने पाळत ठेवली होती. त्यावेळी सापळा रचून त्यांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींमध्ये तीन महिला आहे. त्यांच्या अंगात येत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे.