Top Newsराजकारण

खंजीर खुपसण्याच्या राजकारणावरून शिवसेना-भाजपमध्ये तू-तू-मै-मै !

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं खुलं आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. त्यानंतर चंद्रकांतदादा आणि सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांना उत्तर दिल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आज कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले.

संजय राऊत शिरुर-हवेली इथे होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी थेट चंद्रकांत पाटील यांनाच ललकारले. चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं सांगतानाच ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला राऊत यांनी लगावला.

आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो, असं मी म्हटलं होतं. याचा त्यांना एवढा त्रास झाला की गुन्हा दाखल करा म्हणाले. समोरून वार केल्यावर काय निघणार? कोथळाच निघणार, असा टोला हाणतानाच चंद्रकांतदादांना महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आलेलं सहन होत नाही. जेवढे तुम्ही तडफडत राहणार. तेवढी तुमची शक्ती क्षीण होईल. आघाडीच्या नेत्यांनाही सांगणं आहे की, तुम्ही विरोधकासारखे वागू नका. मी आज वरिष्ठांशी बोलेन. ऐकलं तर बघू नाहीतर शिवसेनेच्या भाषेत सांगू, असं ते म्हणाले. कोण आला रे कोण आला, ही घोषणा भाजपात बघितली का? ती फक्त शिवसेनेतचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

वसंतदादा पाटलांचं काय झालं?, चंद्रकांतदादांचा सवाल

राऊत यांच्या आव्हानाला चंद्रकांत पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. वसंतदादा पाटलांचं काय झालं? आता पवारांवर केवळ पुस्तकच यायचं बाकी आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला. आमचं म्हणणं शिवसेनेविषयी होतं. शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आहे. २०१४ ला संजय राऊतांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. हे जगजाहीर आहे. १४५ चा आकडा करण्याचे शिल्पकार हे संजय राऊत आहेत. राऊतांनी हे सरकार बनवलं आहे. राष्ट्रवादी भाजपची एक एक पंचायत समिती खाते आहे. काँग्रेस नसल्यात जमा आहे, असं सांगतानाच शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे. तरीही ते म्हणतात, खंजीर खुपसला नाही. वसंतदादा पाटलांच काय झालं?; असा सवाल पाटील यांनी केला.

मी खंजीर खुपसलं असं विधान केलं. ते त्यांना जरा झोंबलं. ते कोथळा काढतो असं म्हणाले याविरुद्ध पोलीसात तक्रारी सुरू करा. नारायण राणे थोबाडीत मारतो म्हणाले तर कारवाई केली. मग आम्ही काय मेलेल्या आईचं दूधं प्यायलेलो नाही. आमच्यासोबत विश्वासघात झाला हे आम्ही म्हणायचे नाही का? तुम्ही आम्हाला काय म्हणायचं त्याची स्क्रीप्ट द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल; मुनगंटीवारांची टीका

संजय राऊत यांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, जनताच तुम्हाला संन्यास घ्यायला लावेल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. मुनगंटीवार म्हणाले की, भाजप आपल्या शिवाय सरकार स्थापन करू शकत नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेनं कपोकल्पित गोष्टी समोर आणल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काँग्रेसबद्दल टोकाची भूमिका होती. तरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली. त्यांना राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही. जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल, असं मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणतात कोरोना विरोधात आंदोलन करू. आम्ही पण साथ देऊ. पण ज्या प्रमाणे मंदिर बंद आहे, त्याप्रमाणे दारुची दुकान बंद करा. तुम्हाला दारूच्या दुकानावर एवढं का प्रेम आहे? त्या ठिकाणी गर्दी होत नाही का? मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन बघावं बारमध्ये किती गर्दी आहे, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button