माझा सत्य समोर आणण्याचा प्रयत्न : प्रभाकर साईल
मुंबई : गोवा क्रुझ पार्टीमधील पंच प्रभाकर साईल यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महत्वाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, ”मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करतोय,”असे ते म्हणाले. तसेच, संध्याकाळी या प्रकरणावर सविस्तर बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, यापू्र्वी प्रभाकर साईल यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्यानं पोलिस संरक्षण देण्याची मागणी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साईल यांच्या मागणीनुसार त्यांना पोलीस संरक्षण दिल्याचं सांगितलं आहे.
मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईलने रविवारी एक व्हिडिओ जाहीर करत २५ कोटींच्या तोडपाणीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोऱ्या कागदावर पंच म्हणून स्वाक्षरी घेतल्या तसेच, आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी कारण्याबाबतचं संभाषण ऐकल्याचा दावाही साईल यांनी केला होता.