टोलनाके वर्षभरात हद्दपार होणार; जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित टोल वसुली सुरु होणार
नवी दिल्ली : संपूर्ण भारतात जीपीएस तंत्रत्रानावर आधारीत टोल कलेक्शन यंत्रणेची अंमलबजावणी करत पुढील वर्षभरात रस्त्यांवरून टोल हद्दपाल करण्याचे मोठे विधान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. सध्या देशात ९३ टक्के वाहनांकडून FASTag तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. उर्वरीत ७ टक्के वाहनांसाठी फास्टॅग घेण्यात आलेला नाही अशी माहिती त्यांनी लोकसभेच्या चर्चेत दिली. एका वर्षाच्या कालावधीतच संपुर्ण देशातील टोलनाके हे हटवले जातील असे मी सभागृहाला आश्वासन देतो असेही गडकरी म्हणाले. वाहनचालकांकडून पैसे घेतानाच जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. जीपीएस इमेजिंगच्या तंत्रज्ञानावर ग्राहकांकडून पैसे गोळा करण्यात येतील. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
ज्या वाहनांनी आतापर्यंत फास्टॅग घेतला नाही, अशा वाहनांसाठी मी पोलिस चौकशी लावण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी लोकसभेत सांगितले. जर फास्टॅग बसवण्यात आला नाही, तर टोल गळती आणि जीएसटी चुकवण्यासारखे प्रकार होतील असेही ते म्हणाले. फास्टॅगचे तंत्रज्ञान हे पहिल्यांदा २०१६ साली अंमलात आणण्यात आले. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ पासून फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल आकारणी करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. संपुर्ण देशात या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
फास्टटॅगच्या तंत्रज्ञानामुळे विना अडथळा टोल प्लाझावरून वाहनांचा प्रवास करणे सहज शक्य झाले आहे. या फास्टॅग प्रणालीअंतर्गत ऑटोमॅटिक पद्धतीने पैसे वाहनचालकाच्या खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वजा होण्याची सुविधा आहे. यापुढच्या काळात नवीन निर्मिती होऊन येणाऱ्या वाहनांसाठी फास्टॅग आधीच लावण्यात येणार आहे.
टोल नाक्यावर असलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांचा फोटो काढण्यात येईल. याचा वापर हा वाहनांच्या वाहतूकीचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी होणार आहे. भारतात परराष्ट्र मंत्रालयाकडेही हा डेटा स्टोअर असणार आहे. FASTag प्रणालीअंतर्गत Radio Frequency Identification (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यामुळेच वाहन चालकाच्या खात्यातून त्या प्रवासासाठीच्या टोलचे पैसे ऑनलाईन अकाऊंटमधून कॅशलेस पद्धतीने वजा होतात. फास्टॅग हा गाडीच्या समोरच्या बाजूला लावल्यानंतर आरएफआयडी एंटीनाच्या माध्यमातून हा QR code स्कॅन करण्यात येतो. तसेच टॅग आयडेंटीफिकेशन नंबरही स्कॅन होतो. त्यानंतर टोल नाक्यावर असलेला वाहन रोखणारा बुम बॅरिअर लिफ्ट होतो. त्यामुळे टोल प्लाझावर टोल अकाऊंटमधून ऑटोमॅटिक वजा झाल्याने वाहनाला पुढे जाणे शक्य होते. फास्टॅगच्या प्रक्रियेतच कॅमेरा त्या गाडीचा फोटो कॅप्चर करू शकणार आहे. तसेच फास्टॅगच्या माध्यमातून ते वाहनही ट्रॅक करणे शक्य होणार आहे.