टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकच्या अखेरच्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू आहे. भारताला टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये आज दुसरं पदक मिळालं आहे. भारताच्या कृष्ण नागर यानं एसएच-६ प्रकारात चीनच्या के चू मैन कै याचा पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तिसऱ्या सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कृष्णा नागर यानं चीनी प्रतिस्पर्ध्यावर २१-१७, १६-२१,२१-१७ असा पराभव केला.
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यातील पदकांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. कृष्णा नागर यानं भारताला पाचवं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. शनिवारी प्रमोद भगत यानंही सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याआधी मनीष नरवाल यानं ५० मीटर पिस्तल, अवनी लेखरा हिनं १० मीटर पिस्तल आणि सुमित अंतिल यानं भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारताच्या खात्यात आता ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदकांची कमाई झाली आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतानं २ सुवर्ण आणि ४ रौप्य पदकांची कमाई केली होती.
नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पटकावले रौप्य
टोक्यो पॅरालिम्पिकचा आजचा शेवटचा दिवस असून आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय बॅडमिंटनपटू आणि गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथिराज यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. फ्रान्सच्या वर्ल्ड नंबर वन लुकास मजूर विरुद्धच्या ६३ मिनिटांच्या लढाईत १५-२१, २१-१७,२१-१५ असा पराभव झाला. ३८ वर्षीय सुहास यांनी पॅरालिम्पकमध्ये बॅडमिंटन इव्हेंटमध्ये प्रमोद भगतच्या सुवर्णपदकानंतर रौप्य पदक पटकावले.
एसएल4 वर्गमध्येच तरुण ढिल्लो कांस्य पदकासाठीचा सामना गमावला. त्याला इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावा याने ३२ मिनिटांमध्ये २१-१७, २१-११ ने पराभूत केले. सुहास यांच्या या देदीप्यमान कामगिरीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कौतुक केले आहे.