टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतीय पुरुष संघानं अखेरच्या सामन्यात यजमान जपानवर दणदणीत विजय मिळवला. भारतानं या विजयासह १२ गुणांची कमाई करताना अ गटातील दुसरे स्थान पक्के केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर ब गटातील तिसऱ्या क्रमांकावरील संघाचे आव्हान असणार आहे. भारतीय महिला संघानंही आज पहिल्या विजयाची नोंद करताना उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत.
अ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघानं मध्यांतराला २-१ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात १३व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नवर गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १७व्या मिनिटाला गुरजंत सिंगनं मैदानी गोल केला. सिमरनजीत सिंगनं चेंडूवर ताबा राखताना चेंडू गोलपोस्टच्या दिशेनं भिरकावला, परंतु तो गोलखांब्यावर लागून माघारी परतला, नजिकच उभ्या असलेल्या गुरजंतनं गोल करून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. जपानकडून १९व्या मिनिटाला पहिला गोल आला तो केंटो तनाकाच्या स्टीक्समधून. भारताचा गोलरक्षक पी आर श्रीजेश यानं जपानचे गोल अयशस्वी ठरवले त्यामुळे भारताला पहिल्या हाफमध्ये २-१ अशी आघाडी कायम राखता आली.
दुसऱ्या सामन्यात जपानकडून कोटा वॅटानाबेनं (३३ मि.) गोल करताना बरोबरीचा आनंद साजरा केला, परंतु तो पुढच्याच मिनिटाला मावळला. समशेर सिंगनं पुढच्याच मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. भारतानं डी वर्तुळावर वर्चस्वपूर्ण खेळ करताना जपानवर दडपण कायम ठेवण्यात यश मिळवले होते. चौथ्या सत्रात जपाननं आक्रमक खेळावर भर देताना भारताच्या डी वर्तुळात कूच केली. सामना संपण्यास १० मिनिटांचा कालावधी शिल्लक करताना जपानचा खेळाडू गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु गोलरक्षक श्रीजेशनं डाईव्ह मारून त्यांना बरोबरी मिळवून दिली नाही. त्या काही सेकंदात श्रीजेशनं जपानचं तीन प्रयत्न हाणून पाडले.
निळकंट शर्मानं ५१ व्या मिनिटाला मैदानी गोल करून भारताची आघाडी ४-२ अशी मजबूत केली. त्यानंतर कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगच्या स्टीक्समधून आलेल्या चेंडूला गुरजंत सिंगन दिशा दाखवून ५-२ अशी दमदार आघाडी घेतली. गुरजंतचा हा सामन्यातील दुसरा गोल ठरला. ५९व्या मिनिटाला जपानकडून काजुमा मुराटानं गोल कडून पिछाडी ३-५ अशी कमी केली.
महिला संघाचा पहिला विजय
भारतीय महिला संघानं अ गटात शुक्रवारी पहिल्या विजयाची नोंद केली. नवनीत कौरनं ५७व्या मिनिटाला गोल करून भारताला १-० अशा फरकानं आयर्लंडवर विजय मिळवून दिला. चार सामन्यांतील भारताचा हा पहिला विजय आहे आणि अखेरच्या साखळी फेरीत त्यांना दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीच्या आशा पल्लवीत ठेऊ शकतो.