Top Newsफोकसस्पोर्ट्स

कर्णधार म्हणून तू मिळवलेल्या यशाचा सार्थ अभिमान; अनुष्का शर्माचं विराटसाठी भावनिक पत्र

मुंबई : विराट कोहलीनं शनिवारी जगाला धक्का देणारी बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली अन् चाहते हळहळले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाच्या २४ तासातच विराटनं भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयनं विराटकडून वन डे संघाचे नेतृत्व काढून घेतले. त्यामुळे कसोटी संघाचे कर्णधारपद विराटकडे राहिले होते, परंतु तो आता माजी कर्णधार झाला आहे. आता एक फलंदाज म्हणून भारतासाठी तो खेळणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या कसोटी संघानं आयसीसी क्रमवारीत सातव्या स्थानावरून अव्वल स्थानापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास केला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी कसोटी मालिकेत पराभूत केलं. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराटनं स्वतःची ओळख निर्माण केली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले.

विराटच्या या प्रवासाची साक्षीदार असलेली त्याच पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं इंस्टाग्राममवर भावनिक पत्र लिहिलं आहे. त्यात तिनं विराटच्या या प्रवासाची माहिती दिली आहे. ती म्हणते, २०१४ ची गोष्ट आजही मला आठवतेय. महेंद्रसिंग धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि तू मला सांगितलेस की मी कसोटी संघाचा कर्णधार बनणार आहे. दुसऱ्याच दिवशी तू, एमएस धोनी आणि मी गप्पा मारत होतो आणि तेव्हा तुझ्या दाढीचे केस आतापासूनच राखाडी होत असल्याचे गमतीनं एमएस म्हणाला. आपण सर्व तेव्हा भरपूर हसलो होतो. त्या दिवसापासून तुझ्या दाढीचे केस राखाडी होताना मी पाहतेय. मी तुझ्यातली वाढ पाहिली आहे, अफाट वाढ. तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या आत. आणि हो भारताच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून तुझ्या वाढीचा आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघानं मिळवलेल्या यशाचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु, त्याहीपेक्षा तुझ्यात अंतरंगात झालेल्या वाढीचा मला अधिक अभिमान आहे.

ती पुढे लिहिते, २०१४ मध्ये तू तरुण आणि भोळा होतास. तू अनेक आव्हानांना सामोरे गेलास, ती आव्हान फक्त मैदानावरची नव्हती. हे खरं आयुष्य आहे, याची जाण तुला झाली. पण, मला हे सांगताना आनंद होतोय की तू तुझ्या चांगल्या हेतूनं सर्व आव्हानं यशस्वीरित्या पार केलीस. तू एक उदाहरण तयार केलंस आणि तुझ्या एनर्जीनं तू प्रत्येकामध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण केलीस. काही वेळा तू हरलास, पण त्यावेळी तुझ्या बाजूला बसून मी तुझ्या डोळ्यांतील अश्रू पाहिले आहेत. अजून चांगल करता आलं असतं, असं तुला त्यावेळी वाटायचं. हा असाच तू आहेस आणि तुला इतरांकडूनही अशीच अपेक्षा आहे.

विराटचे नेहमी १०० टक्के योगदान : सचिन तेंडुलकर

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. कोहलीच्या निर्णयावर सचिन तेंडुलकर म्हणाला, कर्णधार म्हणून तुझ्या यशस्वी कारकीर्दिचे अभिनंदन… तू संघासाठी नेहमी १०० टक्के योगदान दिले आहेस आणि यापुढेही देशील. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, असे सचिन म्हणाला.

तू चॅम्पियन आहेस आणि राहशील; भाऊ-बहिणीची प्रतिक्रिया

विराटच्या निर्णयानंतर त्याचा भाऊ आणि बहिण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विकास कोहलीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विराटसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. तू कायमच चॅम्पियन होतास आणि आहेस, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तसंच त्यानं विराटच्या पोस्टवर कमेंटही केली आहे. तू संपूर्ण कुटुंब आणि देशाची मान उंचावली आहे. मला तुझा अभिमान आहे. तू कायम धैर्यानं सर्वाला सामोरं गेलास आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. आम्ही कायमच तुझ्यासोबत आहोत. देव तुझं भलं करो आणि आम्हाला कायमच तुझा अभिमान आहे चॅम्पियन, अशी प्रतिक्रिया त्यानं दिली.

लहानपणापासूनच तुझी खेळाप्रती आवड, प्रामाणिकपणा, समर्पण आम्ही पाहत आलो आहोत. तू वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे. हा निर्णय घेऊन तू तुझी ताकद दाखवून दिली आहे, असंही विराटच्या बहिणीनं म्हटलं आहे.

विराट भाई, माझ्यासाठी तूच खरा लीडर; पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

विराटचा कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय क्रिकेटविश्वाला हादरवणारा होता. गेल्या काही दिवसात विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जात होतं. त्यातच विराटच्या अशा निर्णयामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं. पण असं असलं तरी पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने विराट कोहलीची स्तुती करत, तूच माझ्यासाठी खरा कर्णधार आहे, असं मत व्यक्त केलं.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याने विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर एक ट्विट करत तू माझ्यासाठी खरा लीडर आहेस अशी भावना व्यक्त केली. ‘विराट भाई तू माझ्यासाठी खरा लीडर आहेस. माझ्या मते येणाऱ्या पिढीतील क्रिकेटपटूंसाठी तूच खरा कर्णधार आणि नेता आहेस. कारण युवा क्रिकेटर्ससाी तू प्रेरणास्थान आहेस. मैदानात आणि मैदानाबाहेरही दमदार कामगिरी करत राहा’, असं ट्वीट आमीरने केलं.

पाकिस्तानच्या इतर क्रिकेटपटूंनीही विराट कोहलीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. तू अनेकांना प्रेरणा देणारा स्रोत आहेस असं नसीम शाह म्हणाला. क्रिकेटबद्दल तुझ्यात असलेली तळमळ कायम तुझ्या नेतृत्वात दिसून आली. सात वर्षे आम्ही तुझ्याकडून निर्भिड नेतृत्व आणि खिलाडीवृत्ती शिकलो, असं अहमद शहजादने लिहिलं.

ही मस्करी सुरू आहे का?; मदनलाल यांचा संताप

भारताचे माजी गोलंदाज मदन लाल यांनी विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. ही मस्करी सुरू आहे का?, असा सवाल करताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयनं वन डे कर्णधारपदावरून हटवल्यामुळे विराट नाराज असल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले, कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून विराट कोहलीनं मला आश्चर्याचा धक्का दिला. निवड समिती किंवा बोर्ड यांनी वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यामुळे तो अजूनही नाराज आहे. त्यांनी वन डे संघाचं नेतृत्व का काढून घेतलं?; हा प्रश्न त्याच्या डोक्यात अजूनही घर करून आहे. त्यानं अजून दीर्घकाळ कसोटी संघाची जबाबदारी पार पाडायला हवी होती. त्यानं कसोटीत मोठं यश मिळवलं आहे.

अश्विनचे विराटच्या निर्णयावर सडेतोड मत

विराटने अचानक त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याच्या या निर्णयावर रविचंद्रन अश्विनने रोखठोक मत मांडलं. क्रिकेटमध्ये कर्णधारांबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा त्यांनी केलेले विक्रम आणि त्यांनी मिळवून दिलेले विजय यांच्या बळावरच त्यांना किती आदर दिला जावा हे ठरतं, पण तू कर्णधार म्हणून जे पराक्रम केले आहेस ते कायमच लक्षात राहतील. अनेक लोक ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका येथे भारतीय संघाने मिळवलेल्या विजयाबद्दल बोलतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की विजय हा केवळ एक परिणाम असतो. त्यासाठी केलेले प्रयत्न आणि बांधणी केलेला संघ हा खूप आधीपासून प्रयत्नशील असतो. तू ज्या संघाची बांधणी केलीस त्यासाठी तुझं नेहमीच नाव आदराने घेतलं जाईल, अशा शब्दात अश्विनने विराटच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर मत व्यक्त केलं.

तू तुझ्या उत्तराधिकाऱ्यासाठी मागे सोडलेली डोकेदुखी पाहता मी तुला शाबासकी देतो. तुझ्या कर्णधारपदाच्या काळात मी एक गोष्ट शिकलो की एखाद्याने खास उंचीवर असताना आपलं पद सोडलं पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणावरून आपला संघ पुढील केवळ नवनव्या उंचीवरच जाऊ शकतो, असं ट्वीट करत अश्विनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button