जुन्नर : राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी भाजप- मनसेकडून करण्यात येत आहे. मंदिर उघडण्यासाठी दोन्ही राजकीय पक्षांकडून मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं आहे. मात्र केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील मंदिरे अजुनही बंद ठेवली असल्यामुळे केंद्र सरकारच्या विचारांच्या लोकांनी तारतम्य बाळगावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राच्या संपर्कात असून त्यानुसार उपाययोजना करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना मंदिर उघडण्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केली आहेत. यावर शरद पवार यांनी भाष्य केलं असून विरोधी पक्षाला चांगलाच टोला लगावला आहे. केंद्र सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मार्गदर्शक सुचनांचे कटाक्षाने पालन करत आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्राच्या विचाराच्या लोकांनी तारतम्य बाळगावे असा टोलाच शरद पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी मागील १४ महिन्यांपासून आंदोलन करत आहे. राज्यकर्ते संवेदनशील असतील तर त्यांनी शेतकऱ्यांची नोंद घ्यायला हवी होती. अन्नदात्याकडे केंद्र सरकारचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
माझ्याकडे कृषी खात असताना पिकांना योग्य भाव देत होतो. पण आता शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाही, असा हल्लाबोलही शरद पवार यांनी केला. पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी पिक रस्त्यावर फेकून देत आहेत. नाशिक येथेही शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. याचपार्श्वभूमीवर पवार यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. माझ्याकडे १० वर्ष कृषी खात होतं. त्यावेळी मी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव द्यायचो. शेतकरी देशाची भूक भागवतो. जगाला अन्नधान्य पुरवण्याच काम करू शकतो. पण केंद्र सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. यामुळे शेतमालाच्या किंमती घसरत असल्याचही पवार यावेळी म्हणाले.