माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी परवा एक विधान केले. त्या विधानाची माध्यमात मोठी चर्चा सुरू आहे. बरे झाले भाजपमध्ये आहे, धाड, नाही,समन्स नाही, निवांत झोप लागते हे ते विधान होते. खरंतर याचा अर्थ फार गंभीर होतो. जे नेते भाजपमध्ये नाहीत त्यांच्यावर तपास यंत्रणा धाडी घालतात आणि जे भाजपमध्ये आहेत त्यांना सगळे माफ केले जाते. केंद्रातील सरकारवर आधीच असा आरोप केला जातोय की सरकार ईडी, सीबीआय इत्यादी तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. हा काँग्रेसचा आरोप जणू खरा असल्याचे पाटील यांच्या विधानावरून सिद्ध होते.
सार्वजनिक जीवनात अनेकदा लोक अशी वक्तव्ये करतात की त्याचे अर्थ त्यांनाही कळत नसतात. तोच प्रकार हर्षवर्धन पाटील यांच्याकडून घडला आहे. पाटील दीर्घकाळ काँग्रेसचे नेते होते. राज्यात ते संसदीय कामकाज मंत्रीही होते. त्यामुळे कोणत्या शब्दाचा काय अर्थ निघू शकतो याबाबत ते अनभिज्ञ असावेत असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना काय म्हणायचे होते हे नेमकेपणाने मांडले गेले आहे. हे विधान म्हणजे भाजपचा गौरव समजायचा की बदनामी हे आता पक्षाने ठरवायचे आहे. भाषेत नेहमी एखाद्या वाक्याचे वेगवेगळे अर्थ जरी होत असले तरी ढोबळ मानाने दोन अर्थ होतात, एक असतो शब्दार्थ आणि दुसरा असतो मतितार्थ.
हर्षवर्धन पाटील यांच्या विधानाचा मतितार्थ काही वेगळाच आहे हे आता भाजपाला कळल्याने कदाचित पक्षाने त्यांना तोलून मापून बोलण्याची तंबी पण दिली असावी. तसेही राजकारणात नेते बोलतात त्याचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात असे समजले जाते.शरद पवार यांच्या बाबत असे म्हटले जाते की ते जे बोलतात त्याच्या उलट कृती त्यांना अपेक्षित असते. पवार भक्त म्हणून जो काही संप्रदाय आपल्या राज्यात शिल्लक आहे तो पवारांच्या विधानांचे वेळोवेळी काढले गेलेले अर्थ समजावून सांगत असतो. राजीव गांधी जिवंत असताना पवार काँग्रेसमध्ये होते. लोकसभा निवडणूक काळात पवारांच्या काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती.
प्रचार सभात बोलताना पवारांच्या प्रत्येक वाक्याकडे लोकांचे कान असायचे. जो उमेदवार त्यांच्या गुड बुकात नसायचा त्याचा उल्लेख ते राजीव गांधी यांचा उमेदवार असा करायचे, त्यामुळे लोक त्यातून योग्य अर्थ काढून वागायचे. तेव्हापासून पवार हो म्हणाले की त्याचा नाही हा अर्थ घेण्याची राज्याला सवय झाली होती. राजकारणात तसाही अलीकडे शब्दांना काही अर्थ उरला नसल्याचे दिसते. नेते रात्री शपथ घेऊन पहाटे दुसर्याच कोणत्या तरी पक्षाच्या कळपात सामील झालेले असतात. रात्री एकत्र राहण्याच्या आणाभाका घेऊन अजित पवार पहाटे फडणवीस सोबत सरकार सरकार खेळात सहभागी झालेले असतात, कदाचित यालाच राजकारण म्हणत असावेत.
मराठी आणि हिंदी भाषेत एका शब्दाचे भिन्न अर्थ होतात, मात्र काही लोकांना हिंदीतील शब्द मराठीत वापरण्याचा भयंकर सोस असतो, त्यातून गंभीर प्रसंग तर अनेकदा गमती जमती निर्माण होतात. शिक्षण या शब्दाला हिंदीत शिक्षा असे म्हटले जाते, परंतु शिक्षण धोरण थेट शिक्षा प्रणाली म्हणून वापरले जाते. केंद्रीय शिक्षण मंत्री अनेकदा मराठी राज्यात आल्यावर त्याचा केंद्रीय शिक्षामंत्री होऊन जातो. संरक्षण मंत्री हा तसाच एक शब्द. मराठीत संरक्षण म्हणजे रक्षण आणि हिंदीत रक्षा म्हणजे मराठीत राख होऊन जाते, परंतु काही लोकांना त्याचे काहीच वाटत नसते.