
सकाळी उठल्याबरोबर आधी शेजारी टीपॉयवर ठेवलेल्या ‘ज्ञानेश्वरी’कडे डोळेभरून पाहत हात जोडले. आता आताची गोष्ट आहे की, मी मुंबईच्या त्या ‘ज्ञानेश्वरी’त राहत होतो. काळाचा महिमा अगाध आहे. आता नागपुरात राहून मुंबईच्या त्या ‘ज्ञानेश्वरी’ची आठवण करत या ‘ज्ञानेश्वरी’ला हात जोडतोय. ही ‘ज्ञानेश्वरी’ म्हणजे साक्षात
सरस्वती आहे , तर ती ‘ ज्ञानेश्वरी’ म्हणजे साक्षात लक्ष्मी होती ! ‘होती’ म्हणजे आता गेली ना ती ‘ज्ञानेश्वरी’ आपल्या आयुष्यातून.मुंबईची ती ‘ज्ञानेश्वरी’ आठवली आणि तिच्यासोबतच तो ‘ खाकीबाबा’ही आठवला. त्याची काय गंमत झाली की, एकेदिवशी तयारी करून बाहेर पडण्याच्याच बेतात होतो की , शिपायाने येऊन वर्दी दिली की, कोणीतरी खाकी कपडे घातलेला माणूस बंगल्याच्या गेटवर आला आहे. तो स्वतःचं नाव खाकीबाबा असल्याचं सांगतोय आणि आपल्याला भेटायचंच आहे म्हणून अडून बसला आहे. वास्तविक मी कधीच कोणत्याच देवळात जात नाही. कोणत्याच बाबा महाराजांच्या नादी लागत नाही. आपल्या नेत्यांना नाही ना आवडत असल्या गोष्टी , मग आपणही टाळायच्या अशा गोष्टी असं माझं स्पष्ट मत आहे. आपलं जे असतं ते उघड उघड असतं. कुठेही कसलीही लपवाछपवी नसते. आता परवाचीच गोष्ट पहा ना, एका वाहिनीवर थेट शेजारी पोलीस उभा करून त्याच्या हातात तेल लावलेली काठी देऊन पब्लिकला उघड उघड दम दिलाच की नाही ? आपला कर्मावर विश्वास आहे. कर्म करून स्वतःचा उद्धार कसा करून घ्यावा, दुसऱ्याकडून कर्म करवून घेऊन आपला उद्धार कसा करून घ्यावा, एखाद्याला त्याच्या क्षमतेची जाणीव नसेल, तर त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव करून देऊन त्याच्या सोबतच आपलाही उद्धार कसा करून घ्यावा, या आणि असल्याच अनेक विषयांवर माझा फार म्हणजे फारच अभ्यास आहे. तरी मनात विचार केला, की सकाळी सकाळी कोणी आशा लावून आपल्या दारात आला आहे तर त्याला निराश तरी का करावा ? काय म्हणतो ते ऐकावं आणि थोडीफार दक्षिणा हातावर ठेवून कटवावा. शिपायाला त्या खाकीबाबाला आत घेऊन यायला पिटाळलं. थोड्याच वेळात एक खाकी कपड्यातला रुबाबदार माणूस माझ्या समोर येऊन उभा राहिला. एखादा पोलीस मारतो तसा कडक सॅल्युट त्याने मला मारला. क्षणभर आपल्या डिपार्टमेंटचाच कोणी फौजदार आपल्याला सॅल्युट मारतोय की काय असा मला भास झाला. सोबतच्या शिपायाला, तो खाकीबाबा कुठे आहे म्हणून दरडावून विचारताच त्याने हेच ते बाबा असल्याचं सांगितलं आणि एक कडक सॅल्युट मारून तो निघून गेला.
पुढचा निदान तासभर तरी तो खाकीबाबा मला लक्ष्मीची विविध रूपातली विविध नावं जसे की, ‘खोका लक्ष्मी’ ,’ पेटी लक्ष्मी’ ,’टार्गेट लक्ष्मी’, ‘खंडणी लक्ष्मी’ , ‘हप्ता लक्ष्मी’ आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काय काय करावं हे समजावून सांगत होता आणि आश्चर्य म्हणजे मीसुद्धा मंत्रमुग्ध होऊन ते सर्व ऐकत होतो. जाता जाता त्याने ,’ देख बेटा, ऊपरवाला हरएक को जिंदगी में एक मौका जरूर देता है. उसको पहचाननेका और आगे बढनेका. समजा ?’ असा सल्लाही दिला आणि मी ‘ हां बाबा, आपकी बात तो सही है.’ असं बोलताच
तो तडक बाहेर पडला.
आज चौकशीसाठी बोलावलं होतं म्हणून नेत्यांना चारदा फोन केला. म्हटलं काही मार्गदर्शन करतील, धीर देतील, पण त्यांनी संपर्क होऊ दिला नाही. मला एकदम ‘ वाल्या कोळी’ ची गोष्ट आठवली. कानात, ‘ सुख के सब साथी दुख में न कोय.’ गाणं वाजू लागलं. तयारी केली आणि चौकशीसाठी गेलो. एके काळी मला सॅल्युट मारून ‘ येस सर’ म्हणणाऱ्याने एक पत्र लिहून मला अडचणीत आणलं. माझं सगळं विश्वच उध्वस्त केलं. रामायणात वीर हनुमानाने रावणाची लंका जाळली होती. या कलियुगात , माझ्या समोर हात जोडून उभा राहणाऱ्या या ‘ परमबीर हनुमानाने’ माझी आयोध्याच जाळून टाकली ! ‘आलिया भोगाशी असावे सादर !’ दुसरे काय ?
(लेखकाचा संपर्क ७८७५० ७७७२८)




