
महाराष्ट्राची पाठ संकटं सोडायला तयार नाहीत. या वर्षी एकामागून एक चक्रीवादळं आणि त्यानंतर अतिवृष्टीनं शेतकरी कोलमडून पडला आहे. हातातोंडाशी आलेला घास तर वादळांनी काढून घेतलाच; शिवाय शेती खरवडून निघाली. हे नुकसान मोठं आहे. निसर्ग, तोक्ते, गुलाब आणि आता शाहीन वादळानं महाराष्ट्राची झोप उडाली आहे. अतिवृष्टीनं रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगलीत झालेलं नुकसान वेगळंच. एका नुकसानीचे पंचनामे होत नाहीत, तोच दुस-या नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ येते. कोरोनामुळं आधीच महाराष्ट्र सरकारची तिजोरी रिक्त झाली असताना आता आणखी संकटांनी सरकारचीही कोंडी झाली आहे. एकामागून एक एवढी वादळं, मॉन्सूनच्या काळातही वादळं आणि परतीच्या पावसाच्या काळातही हाहाकार असं कधीच घडलं नव्हतं. त्यातही जगाच्या एका कोप-यात झालेल्या हवामान बदलाचा फटका जगातील दुस-या भागातील शेतक-यांना कसा बसतो, याचा प्रत्ययही आता आला. हजारो किलोमीटर प्रवास करूनही ही वादळं भारतात आल्याचं दिसलं. स्थानिक बदल हे वादळाला जेवढे कारणीभूत ठरतात, त्याहून अधिक कारण जागतिक बदल ठरतात. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळं महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या अतिवृष्टी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कमी पाऊस आणि विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी असं चित्र गेल्या काही वर्षांत वारंवार दिसायला लागलं आहे. निम्म्या महाराष्ट्र ऑक्टोबरच्या सुरुवातीला पूरस्थितीला तोंड देतो आहे. महाराष्ट्रात पुरानं कितीतरी जणांचे बळी घेतले. जुलै ते सप्टेंबर या काळात आपत्ती व्यवस्थापन विभागाला काम करावं लागतं. आता त्याचा कालावधी वाढवावा लागतो, की काय अशी स्थिती आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील बहुतांश धरणं या वर्षी भरल्यानं किमान पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून तरी सुटका झाली आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी हे तीनही प्रकल्प भरल्याने त्यांच्या तसेच वरच्या धरणांच्या लाभक्षेत्रातील सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. पैनगंगा नदीला पूर आल्यानं मराठवाडयाचा विदर्भाशी असलेला संपर्क तुटला आहे. नांदेड- नागपूर दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळं नदीकाठच्या शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारनं घेतली पाहिजे.
राज्यात काही जिल्ह्यांत गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळं महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्याचा राज्य सरकारनं घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळाचा परिणाम अजूनही ओसरला नसताना, आता दुसऱ्या एका वादळाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हे वादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव ‘शाहीन’ असेल. हे नाव कतारनं दिलं आहे. या दोन्ही वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला असला, तरी आता पंचनाम्याची वाट न पाहता त्यांना तातडीनं मदतीची गरज आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं वाहून गेली; मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असं ठाकरे यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनानं तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावं तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असं त्यांनी बजावलं. सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल आणि कृषी विभागानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळं काही ठिकाणी फळबागांचंही नुकसान झालं आहे, शेत आणि पिकं वाहून गेली आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं तसंच स्थानिक पोलिस यंत्रणेनं उस्मानाबाद, लातूर , औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविलं. याआधी, मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळानं आधी केरळपासून गुजरातपर्यंत पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढलं होतं; मग ‘तौक्ते’च्या अवशेषांनी थेट दिल्लीपर्यंत पाऊस पाडला. भर उन्हाळ्यात दिल्लीचं तापमान तेव्हा 16 अंशांपर्यंत खाली आलं होतं. जमिनीला धडकल्यानंतर अठरा तासांपर्यंत या वादळाचा जोर कायम होता. गुलाब चक्रीवादळानं तर भारताच्या दोन्ही किनाऱ्यांवर पाऊस पाडला. एखादं चक्रीवादळ जमिनीवर धडकतं, तेव्हा त्याचा जोर कमी होतो. कारण वादळाला समुद्रातून मिळणारं बाष्प आणि उष्णता कमी होते. त्यामुळंच वादळ निवळतं. हवामान बदलामुळं समुद्राचं तापमान वाढलं आहे आणि त्यामुळे चक्रीवादळातील बाष्पाचं प्रमाण वाढलं आहे. अटलांटिक आणि हिंद महासागरातील प्राथमिक संशोधनातही असेच संकेत मिळत आहेत. महासागरांचं तापमान जसं वाढत आहे, तसं वाढत्या बाष्पामुळे चक्रीवादळांना अधिक उर्जा मिळतं आहे. गुलाब चक्रीवादळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मॉन्सूनच्या परतीच्या काळात हे वादळ आलं. असं फारच क्वचित घडतं.
मॉन्सूनच्या काळात कधी चक्रीवादळं येताना दिसत नाहीत; पण गेल्या काही वर्षांत मॉन्सून येण्याचा काळ आणि परतीचा काळया दिवसांच्या जवळ चक्रीवादळं तयार होऊ लागली आहेत. 2018 मध्ये ‘गजा’ या चक्रीवादळानं बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत प्रवास केला होता. अर्थात तोवर त्याची तीव्रता बरीच कमी झाली होती. 1984 मध्येही पाँडिचेरीजवळ तयार झालेल्या एका चक्रीवादळानं पुढं अरबी समुद्रात प्रवेश करून थेट सोमालियापर्यंत प्रवास केला होता. एका वादळातून दुसरं वादळ किंवा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. 2019 मध्ये फिलिपिन्सजवळ पॅसिफिक महासागरात जन्मलेल्या मात्मो वादळाच्या अवशेषातूनच बंगालच्या उपसागरात पुढं ‘बुलबुल’ चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. त्या वादळाचा तडाखा बांगला देशासह भारतात बंगाल आणि ओडिसालाही बसला होता. हरिकेन-टायफून जॉनचा या चक्रीवादळानं 1994 मध्ये पॅसिफिक महासागरात तेरा हजार किलोमीटर्सचा प्रवास केला होता. एखाद्या चक्रीवादळानं असं मोठं अंतर कापणं किंवा जमिनीचा एखादा भाग ओलांडून पलिकडच्या दुसऱ्या समुद्रात प्रवेश करणं ही गोष्ट तशी नवी नाही; पण भारतात असं सर्रास होताना दिसत नाही. हिंद महासागर इतर महासागरांशी जोडला गेला आहे आणि तिथल्या घडामोडींचाही भारतातल्या हवामानावर परिणाम होत असतो. अनेकदा दक्षिण चिनी समुद्रातून आणि पश्चिम पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रात उसळलेल्या चक्रीवादळांचे अवशेष बंगालच्या उपसागरात प्रवेश करतात आणि परिस्थिती पूरक असेल तर त्यांचं चक्रीवादळात उदाहरण होतं. पॅसिफिक महासागरतील परिस्थितीचा एरव्हीही मॉन्सूनवर परिणाम होत असतो. त्या प्रदेशातील आणि विशेषतः दक्षिण चिनी समुद्रातील घडामोडींचा भारताच्या हवामानाशी संबंध आहे. त्यावर अधिक बारकाईनं अभ्यास व्हायला हवा. भारत तीन बाजूंनी समुद्रानं वेढलेला देश आहे. इथं सतत कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होत असतात आणि त्यांचा समुद्र सुदूर महासागरातील परिस्थितीशी असतो. फक्त भारतापुरता नाही, तर जगाच्या हवामानावर लक्ष ठेवणं म्हणूनच महत्त्वाचं आहे. या कामी उपग्रह पुरेसे ठरत नाही, तर महासागरांतील परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या उपकरणांचा वापर वाढवणं गरजेचं आहे. महासागरांचं तापमान जसं वाढत जाईल, तशी चक्रीवादळासारख्या घटनांची तीव्रता, वारंवारता आणि नुकसान करण्याची क्षमता वाढत जाईल, असं अनेक संशोधनांतून आधीच समोर आलं आहे. त्यामुळं अशा घटनांचा सामना करू शकणारी व्यवस्था उभी करणं, तंत्रज्ञान विकसित करणं आणि शेतीच्या पद्धतींमध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे.




