गडचिरोलीत पोलीस चकमकीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली : गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. एटापल्लीमधील पेदी – कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलीस विभागाकडून चकमक सुरु आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात चकमक सुरु आहे. कोटरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीद्वारे पहाटे सी-६० पोलीस पथकाने ऑपरेशन सुरु केले होते.
नक्षलवाद्यांनी त्यांचा मोर्चा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याकडे वळवल्याचं चित्र आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर गेल्या महिन्यात ग्रेनेड टाकला होता. त्याचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जाते. पोलीस स्टेशनपर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क व्हावं लागत आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चकमक अजूनही सुरू असून मृतदेह एकत्र करण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितलं. एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत ही माहिती अभियान संपल्यावर सांगता येईल असं ते म्हणाले.
कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्सल तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती अशी माहिती आहे. खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती.



