कोरोनाच्या संसर्गामुळे कुंभमेळा प्रतिकात्मक करा; पंतप्रधानांचे साधु-संतांना आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटात कुंभमेळा प्रतिकात्मक करा असं आवाहन केलं. पंतप्रधान मोदींनी जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांना हे आवाहन केलं.
देशात कोरोनाचा कहर सुरू असून उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेल्या महा कुंभमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. यादरम्यान श्री पंच निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचे कोरोनाने निधन झाले. तसेच अनेक साधु-संत कोरोनाबाधित झाले. या पार्श्वभूमीवर हरिद्वारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभदरम्यान होणाऱ्या अनियंत्रित कोरोना संसर्गाबाबत भाष्य केले आहे. यासंदर्भात मोदींनी एक ट्विट केले. आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्यांशी आज फोनवर बोलणे झाले, “सर्व संतांच्या आरोग्याबद्दल माहिती घेतली. साधू संत प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करत आहेत. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आतापर्यंत दोन शाही स्नान झाले. कोरोंनाच्या वाढत्या संसर्गामुळे कुंभ हे प्रतिकात्मक व्हावे, अशी विनंती केली आहे. जेणेकरून या संकटाविरूद्धच्या लढाईला बळ मिळेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी संवाद साधल्यानंतर स्वामी अवधेशानंद यांनीही भाविकांनी मोठ्या संख्येने स्नान करण्यासाठी येऊ नये, तसेच सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले की, “माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाचा आम्ही आदर करतो. जीवनाचे रक्षण करणे हे एक पुण्य आहे. माझे जनतेला आवाहन आहे की, कोविडच्या वाढत्या संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता स्नानासाठी कोणीही येऊ नये. तसेच कोरोनाचे नियम पाळण्याचे देखील आवाहन करीत आहेत. ”
हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.
निरंजनी आखाड्याची घोषणा
हरिद्वार कुंभमेळ्यात भाविक आणि संतांची गर्दी झाली असून, मोठ्या संख्येनं लोक दररोज कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. यानंतर निरंजनी आखाड्यानंही कुंभमेळा संपुष्टात आल्याची घोषणा केलीय. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभमेळा संपविण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुंभमेळा संपवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणूनच 17 एप्रिल रोजी कुंभमेळा संपेल. बाहेरून आलेल्या सर्व संत, माहात्म्यांना परत जाण्याची विनंती केली गेलीय. 17 एप्रिलपर्यंत कुंभमेळा रिकामा होणार आहे.




